Doping Test : डोपिंगप्रकरणी धावपटू निकितावर तीन वर्षांची बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Doping Test  nikita raut

Doping Test : डोपिंगप्रकरणी धावपटू निकितावर तीन वर्षांची बंदी

नागपूर : नागपूरची आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतवर डोपिंग प्रकरणी तीन वर्षाची बंदी टाकण्यात आली आहे. बंदीची शिक्षा भोगणारी ती नागपूरची आता तिसरी खेळाडू ठरली आहे. यामुळे नागपूरच्या गौरवशाली ॲथलेटिक्स परंपरेला धक्का बसला आहे.

नाडाने तिच्यावर ही बंदी टाकली असून तशी माहिती जागतिक ॲथलेटिक्स महासंघाच्या ॲथलेटिक इंटिग्रिटी युनिटला (एआययू) कळवली आहे. त्यानुसार एआययूने आपल्या संकेतस्थळावर फेब्रुवारी महिन्यात बंदी टाकण्यात आलेल्या अन्य ११ भारतीयांसह निकीताचे नावही जाहीर केले.

गेल्यावर्षी बंगळूर येथे झालेल्या विद्यापीठ खेलो इंडिया स्पर्धेत २५ वर्षीय निकिताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते.

त्यानंतर राष्ट्रीय उत्तेजक विरोधी पथकाने (नाडा) तिच्या युरीनचा नमुना घेऊन चाचणी केली होती. त्यात तिने १९- नोरँड्रोस्टेरोन हे बंदी असलेले ॲनाबोलिक स्टेरॉईड घेतल्याचे सिद्ध झाले होते. यावर आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघाने ३० वर्षापासून बंदी टाकली आहे. याचा वापर मुख्यत्वे स्नायूंची ताकद वाढविण्यासाठी केला जातो. बंदीचा कालावधी २ मे २०२२ पासून ग्राह्य धरण्यात आला असून हा कालावधी १० जुलै २०२५ रोजी संपुष्टात येईल.

कामगिरी रद्द होईल

ही बंदी लागू झाल्याने तिची खेलो इंडिया व त्यानंतरची कामगिरी रद्द समजण्यात येईल. यामुळे तिने खेलो इंडियात जिंकलेले सुवर्णपदक व तिला मिळालेले प्रावीण्य प्रमाणपत्र परत करावे लागेल. या प्रावीण्य प्रमाणपत्राचा गैरवापर होऊ नये यासाठी जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेला पुढाकार घ्यावा लागेल.

खेलो इंडिया स्पर्धेनंतर तिने जून २०२२ मध्ये चेन्नई येथे झालेल्या आंतर राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत पाच हजार मीटर शर्यतीत नववे स्थान मिळविले होते. ती कामगिरीही रद्द करण्यात येईल.

उत्तेजक माझ्या शरिरात कसे आले याविषयी कल्पना नाही. या संदर्भात २०१९ मध्ये दुखापतीवर उपचार सुरू असताना घेतलेल्या औषधाचा पुरावा पाठविला होता. मात्र, बहुधा त्यांना ती कागदपत्रे पुरेशी वाटली नसावी किंवा योग्य वाटली नसावी. आता यावर फारसे काही बोलण्यासारखे नाही. सध्या स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असून सरावही सुरू आहे. त्यामुळे तीन वर्षानंतर पुनरागमन करेल, हे निश्चित.

- निकिता राऊत, धावपटू.

टॅग्स :sports