
IND vs AUS: अडीच दिवसात खेळ खल्लास! भारत WTC अंतिम फेरीत खेळणार की बाहेर? जाणून घ्या पुढचे गणित
Ind vs Aus 3rd Test : इंदूर कसोटी सामना जिंका आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी (डब्ल्यूटीसी) लंडनचे तिकिट निश्चित करा अशी स्थिती तीन दिवसांपूर्वी होती, परंतु अडीच दिवसांत भारतीय संघाचा खेळ खल्लास झाला आणि डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतला अंतिम सामना शिल्लक असताना जर तरची गणित पुन्हा तयार झाली आहेत. तरीही भारतीय संघ अंतिम सामना गाठू शकतो.
वास्तविक ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटी सामना जिंकून डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना निश्चित केला. आता त्यांचे प्रतिस्पर्धी कोण हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. त्यासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात चुरस आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील भारताचा अखेरचा सामना शिल्लक आहे त्याचप्रमाणे श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेवरही भारताला लक्ष ठेवावे लागणार आहे.
कसोटी अजिंक्यपदाच्या स्पर्धेत किती विजय मिळवले यावरूनच अंतिम सामना कोण खेळणार हे निश्चित होत नाही तर सरासरी टक्केवारी (पसेंटेज गुण : पीसीटी) मोजली जाते. ही सरासरी विजयामुळे. मिळवलेले गुण आणि पराभवामुळे गमावलेले गुण यांच्या वजाबाकीतून तयार होते. ऑस्ट्रेलियाची आता सर्वाधिक टक्केवारी ६८.५२ झाली आहे. आता अहमदाबाद येथे होणारा अखेरचा सामना ऑस्ट्रेलियाने गमावला तरी ते डब्यूटीसी अंतिम सामना खेळतील कारण त्यांची टक्केवारी ६४.९१ इतकी होईल.
किती आहेत भारताचे गुण
इंदूर कसोटी सामना गमावल्यामुळे भारताची टक्केवारी (पीसीटी) ६०.२९ झाली. यंदाच्या या स्पर्धेत भारताने १७ कसोटींतून (१० विजय २ अनिर्णित) १२३ गुणांची कमाई |केली; परंतु निर्धारित वेळेत घटके पूर्ण न केल्यामुळे भारताने पाच गुण गमावलेले आहेत.
काय आहे भारतीयांसाठी पुढचे गणित
जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी भारत आणि श्रीलंकेत आता स्पर्धा
भारताने अहमदाबाद येथे होणारा अखेरचा कसोटी सामना जिंकला तर थेट प्रवेश
हा सामना जिंकला तर भारताचे १३५ गुणांसह पीसीटी ६२.५ इतकी होईल.
अहमदाबाद येथील सामना गमावला तर भारताची पीसीटी ५६.९४ अशी होईल आणि मग न्यूझीलंड- श्रीलंका मालिकेवर लक्ष ठेवून राहावे लागेल.
अहमदाबाद येथील सामना अनिर्णित राहिला तर भारताची पीटीसी ६८.७९ अशी होईल त्या परिस्थितीतही न्यूझीलंड-श्रीलंका मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
श्रीलंकेला अंतिम सामना खेळायचा असेल तर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत २-० विजय अनिवार्य.
श्रीलंकेने १-० असा विजय मिळवला किंवा १-१ बरोबरी साधली तरी ते अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाद होती