अॅथलेटिक्‍स महासंघाचा थेट जिल्हा संघटनांना निधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

भारतीय अॅथलेटिक्‍स महासंघाने नवोदित ऍथलिटस्‌ घडवण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या जिल्हा संघटनांना थेट मदत करण्याचे ठरवले आहे. सुरुवातीस देशातील शंभर जिल्ह्यांना हा निधी देण्यात येईल. त्याचबरोबर राष्ट्रीय आंतर जिल्हा कुमार ऍथलेटिक्‍स स्पर्धेत त्यांचा सहभाग वाढू शकेल.

मुंबई : भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने नवोदित ऍथलिटस्‌ घडवण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या जिल्हा संघटनांना थेट मदत करण्याचे ठरवले आहे. सुरुवातीस देशातील शंभर जिल्ह्यांना हा निधी देण्यात येईल. त्याचबरोबर राष्ट्रीय आंतर जिल्हा कुमार ऍथलेटिक्‍स स्पर्धेत त्यांचा सहभाग वाढू शकेल.

जिल्हा संघटनांना थेट निधी देण्याच्या योजनेची ही सुरुवात आहे. त्याचा आढावा घेतल्यानंतर योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत निर्णय होईल. एखादा राष्ट्रीय क्रीडा महासंघ जिल्हा संघटनांना थेट निधी देणार असल्याची ही पहिलीच वेळ आहे, असे भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशासाठी देशांतर्गत स्पर्धेचा दर्जा उंचावण्याची गरज आहे. त्यासाठी गुणवान ऍथलिटस्‌ना लहान वयातच प्रोत्साहन हवे; त्यादृष्टीनेच ही योजना आहे. यास केंद्रीय क्रीडा मंत्रालय तसेच खेलो इंडियाचे भक्कम पाठबळ नक्कीच लाभेल. त्यासाठी आम्ही क्रीडा खात्याबरोबर चर्चाही केली आहे, असेही सुमारीवाला यांनी सांगितले.

नीरज चोप्रा, दुती चंद जिल्हा स्पर्धेतूनच
राष्ट्रीय आंतर जिल्हा कुमार स्पर्धेने भारतास चांगले ऍथलिट दिले आहेत. नीरज चोप्रा, दुती चंद, नवजोत कौर, व्ही. सुधा यांनी याच स्पर्धेत प्रभावी कामगिरी करीत लक्ष वेधले होते. यंदाची स्पर्धा 24 नोव्हेंबरपासून होईल. त्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात चाचणी स्पर्धा होतील. भारतीय ऍथलेटिक्‍स संघटनेचे पदाधिकारी त्यासाठी देशभरातील 500 जिल्हा संघटना प्रतिनिधींबरोबर चर्चा करणार आहेत.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: athletic federation of india will grant to 100 district association