esakal | वॉव्रींकाला हरवून मरेचे गटात वर्चस्व
sakal

बोलून बातमी शोधा

वॉव्रींकाला हरवून मरेचे गटात वर्चस्व

वॉव्रींकाला हरवून मरेचे गटात वर्चस्व

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन -  ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरे याने एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील प्रवेशावर थाटात शिक्कामोर्तब केले. त्याने स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉव्रींकाला सहा गेमच्या मोबदल्यात हरविले. त्याने ६-४, ६-२ असा विजय मिळविला.

मरेला ‘जॉन मॅकेन्रो’ गटातून आगेकूच करण्यासाठी केवळ एक सेट जिंकण्याची गरज होती. त्याने तीन सेटमध्ये सामना गमावला असला, तरी एक सेट जिंकल्यामुळे त्याची आगेकूच नक्की झाली असती; मात्र त्याने दोन सेटमध्ये विजय मिळवून गटातील वर्चस्व कायम राखले. दुसरीकडे वॉव्रींकाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी दोन सेटमध्ये बाजी मारणे आवश्‍यक होते. प्रत्यक्षात त्याचे आव्हान दोन सेटमध्ये आटोपले. त्यामुळे त्याच्या उपांत्य फेरीच्या आशा संपुष्टात आल्या.

त्याने सलग २२वा सामना जिंकला. चार खेळाडूंच्या गटातील तिन्ही सामने मरेने जिंकले. गटातील शेवटच्या सामन्यात क्रोएशियाच्या मरिन चिलीचने जपानच्या केई निशीकोरीला हरविले; पण या निकालामुळे निशोकोरीच्या वाटचालीवर प्रतिकूल परिणाम झाला नाही; मात्र या विजयामुळे त्याने जागतिक क्रमवारीत फ्रान्सच्या गेल माँफिसला मागे टाकून सहावे स्थान मिळवेल. ‘इव्हान लेंडल’ गटात नोव्हाक जोकोविच यानेसुद्धा अशीच कामगिरी केली. 

मरेची सुरवात काहीशी संथ झाली. त्याने पहिल्या सेटच्या मध्यास वॉव्रींकाला रोखले. मरेने सांगितले, की ‘पहिला सेट चुरशीचा झाला. मी अंतिम टप्यात ब्रेक मिळविला. एका सेटची आघाडी घेतल्यानंतर माझ्यावरील दडपण कदाचित कमी झाले असावे. त्यामुळे मी आणखी मुक्तपणे खेळ करू शकलो.’ पहिल्या सेटमध्ये मरेने सातव्या गेममध्ये ब्रेक मिळविला. दुसऱ्या सेटमध्ये त्याने ४-० अशी घोडदौड केली. त्याने एक तास २६ मिनिटांत सामना जिंकला.