
रविंद्र जडेजा आणि बुमराहच्या गौलंदाजीवर कांगारुंचा संघ कोलमडला
रोहित शर्माने 77 चेंडूचा सामना करत 26 धावा केल्या. भारताच्या धावफलकावर त्यावेळी 70 धावा होत्या. त्यानंतर अर्धशतकी खेळी करुन शुभमन गिलही बाद झाला. 85 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. कमिन्सने त्याची विकेट घेतली. दुसऱ्या दिवसाचा डाव संपला तेव्हा भारतीय संघाने 2 बाद 96 धावा केल्या होत्या. अजूनही टीम इंडिया ऑस्ट्रेलियन टीमपेक्षा 242 धावांनी पिछाडीवर आहे.
स्मिथ-लाबुशेन जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी रचली. रविंद्र जडेजाने मॅथ्यूच्या रुपात कांगारुंना चौथा धक्का दिला. तो 13 धावा करुन परतला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या कॅमरुन ग्रीनला बुमराहने खातेही उघडू दिले नाही. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारालाही बुमराहने अवघ्या एका धावेवर चालते केले. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज आणि गेल्या दोन कसोटी सामन्यात सपशेल अपयशी ठरलेला स्मिथने मालिकेतील पहिले शतक झळकावले. पॅट कमिंन्सच्या रुपात जडेजानं डावातील तिसरी विकेट घेतली.
तळाच्या फलंदाजीत स्टार्कने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याने 30 चेंडूत 24 धावा केल्या. सैनीने त्याला तंबूत धाडले. नॅथन लायनच्या रुपात ऑस्ट्रेलियाला जडेजाने नववा धक्का दिला. शतकी खेळी करणाऱ्या स्मिथलाही जडेजानेच धावबाद केले. त्याने 226 चेंडूत 16 चौकाराच्या मदतीने 131 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 धावांपर्यंत मजल मारली आहे.