AUS vs IND: सिडनीत मोहम्मद सिराजवर वर्णभेदी टीका, उपद्रवी प्रेक्षकांची स्टेडियममधून हकालपट्टी

सकाळ ऑनलाइन टीम
Sunday, 10 January 2021

ही घटना रविवारी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील 86 व्या षटकांत घडली. मोहम्मद सिराज आपली 25 वी ओव्हर संपवून स्क्वेअर लेक बाऊंड्रीवर क्षेत्ररक्षण करत होता.

सिडनी- भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी वर्णभेदी टीका केल्यामुळे स्टेडिअममधील सहा प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढण्यात आले. या घटनेत पोलिसांनी हस्तक्षेप करुन या प्रेक्षकांना बाहेरचा रस्ता दाखवला. भारतीय संघ व्यवस्थापनाने शनिवारी मोहम्मद सिराज आणि जसप्रित बुमराहविरोधात वर्णभेदी टीका केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. रविवारी पुन्हा अशीच घटना पाहायला मिळाल्यानंतर पोलिसांनी या उपद्रवी प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढले. 

ही घटना रविवारी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील 86 व्या षटकांत घडली. मोहम्मद सिराज आपली 25 वी ओव्हर संपवून स्क्वेअर लेक बाऊंड्रीवर क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी तो कर्णधार अंजिक्य रहाणेकडे गेला. त्यानंतर दोघेही स्क्वेअर लेग अंपायर पॉल रायफलकडे गेले. त्यावेळी भारतीय टीम एकत्रित आली. त्यावेळी रहाणे आणि दोन्ही अंपायरमध्ये चर्चा झाली. सर्वजण बाऊंड्री लाइनवर गेले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशी बोलू लागले. सुरक्षा अधिकारी नंतर प्रेश्रकांमध्ये उपस्थितीत काही लोकांशी बोलू लागले. विशेषतः काही युवक आणि एका जोडप्याची त्यांनी चौकशी केली. त्यानंतर या सर्वांना स्टेडिअमबाहेर काढण्यात आले. 

हेही वाचा- शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणजे बर्ड फ्लू पसरवण्याचा कट; भाजपचा आमदार बरळला

शनिवारीही बुमराह आणि सिराजवर काही प्रेक्षकांनी अशीच वर्णभेदी टीका केली होती. भारताने आयसीसीकडे याबाबत अधिकृत तक्रार दाखल केली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सुरक्षाप्रमुख सीन कॉरल यांनी याविरोधात कडक कारवाईचे आश्वासन दिले होते. भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शनिवारी वर्णभेदी टीप्पणीची तक्रार केली होती. मोहम्मद सिराजवर सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना वर्णभेदी टीका करण्यात आली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AUS vs IND 3rd test Racial Comments On Mohammad Siraj in Sydney spectators were taken out of the stadium