बांगलादेश दौरा ऑस्ट्रेलियाकडून स्थगित

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

अवघ्या काही दिवसांवर आलेला बांगलादेश दौरा ऑस्ट्रेलियाने लांबणीवर टाकला आहे. ऑक्‍टोबरमध्ये होणारी ट्‌वेंटी 20 मालिका 2021 मध्ये होईल असे जाहीर केले; तर फेब्रुवारीतील कसोटी मालिका जून-जुलैपर्यंत लांबणीवर टाकली आहे.

ढाका : अवघ्या काही दिवसांवर आलेला बांगलादेश दौरा ऑस्ट्रेलियाने लांबणीवर टाकला आहे. ऑक्‍टोबरमध्ये होणारी ट्‌वेंटी 20 मालिका 2021 मध्ये होईल असे जाहीर केले; तर फेब्रुवारीतील कसोटी मालिका जून-जुलैपर्यंत लांबणीवर टाकली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रमानुसार ऑस्ट्रेलियाचा संघ दोन कसोटींसाठी फेब्रुवारीत बांगलादेशमध्ये येणार होता, पण आता ही मालिका जून-जुलैत होईल, असे बांगलादेश क्रिकेट मंडळाचे प्रमुख अक्रम खान यांनी सांगितले. बांगलादेश-ऑस्ट्रेलिया मालिका जागतिक कसोटी स्पर्धेचा भाग आहे. या क्रमवारीत सध्या ऑस्ट्रेलिया चौथे आहेत; तर बांगलादेश त्यांची पहिली कसोटी नोव्हेंबरमध्ये भारताविरुद्ध खेळणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघ दोन ट्‌वेंटी 20 लढतींसाठी ऑक्‍टोबरमध्ये बांगलादेश दौऱ्यावर येणार होता, पण आता ही मालिकाही लांबणीवर पडली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात 2021 मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धेपूर्वी बांगलादेश दौऱ्यावर येईल. त्या वेळी दोनऐवजी तीन सामने खेळणार आहेत.

बांगलादेश युवा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर
बांगलादेशचा युवा संघ पाच एकदिवसीय लढती खेळण्यासाठी न्यूझीलंडला रवाना झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीस बांगलादेश संघ न्यूझीलंडमध्ये असताना ख्राईस्टचर्च मशिदीवर हल्ला झाला होता. या हल्ल्यातून बांगलादेश खेळाडू थोडक्‍यात बचावले होते. त्यानंतर प्रथमच बांगला संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जात आहे. संघासाठी कडेकोट सुरक्षा आहे, असे न्यूझीलंड सरकारने स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: australia postpone bangladesh tour