esakal | क्रोएशियाच्या मिर्यानाची स्वप्नवत घोडदौड कायम
sakal

बोलून बातमी शोधा

क्रोएशियाच्या मिर्यानाची स्वप्नवत घोडदौड कायम

क्रोएशियाच्या मिर्यानाची स्वप्नवत घोडदौड कायम

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मेलबर्न - क्रोएशियाची टेनिसपटू मिर्याना ल्युचिच-बॅरोनी हिने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीतील घोडदौड कायम राखत उपांत्य फेरीत धडक मारली. तिने कॅरोलिना प्लिस्कोवाला हरविले. वयाच्या 34व्या वर्षी ही कामगिरी केल्यानंतर आता तिच्यासमोर 35 वर्षांच्या सेरेना विल्यम्सचे आव्हान असेल. या दोघींत 1998च्या विंबल्डनची उपांत्य लढत झाली होती. त्यात सेरेनाची सरशी झाली होती.

चेक प्रजासत्ताकाच्या कॅरोलीनाचे पारडे मिर्यानाविरुद्ध जड असल्याची चर्चा होती, पण मिर्यानाने 6-4, 3-6, 6-4 असा विजय संपादन केला. मिर्यानाने ज्यूनियर असताना ही स्पर्धा तसेच अमेरिकन ओपन जिंकले होते. एकेरीतही तिने उल्लेखनीय कामगिरी केली, पण नंतर वडील तसेच प्रशिक्षक असलेल्या मरिन्को यांच्याशी तिचा वाद झाला. वडिलांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप तिने केला होता. यामुळे या शतकाच्या प्रारंभी तिला कोर्टपासून दूर राहावे लागले होते.

पुनरागमनानंतर तिने क्रमवारीत 79व्या क्रमांकापर्यंत मजल मारली आहे.

सेरेनाचा विजय
सहा वेळच्या विजेत्या सेरेना विल्यम्सने ब्रिटनच्या योहाना कॉंटाला 6-2, 6-3 असे हरविले. कॉंटाला नववे मानांकन होते. तिने यापूर्वी नऊ सामने आणि 18 सेटची यशोमालिका राखली होती. कारकिर्दीत प्रथमच सेरेवाविरुद्ध खेळताना तिला गारद व्हावे लागले. सेरेनाने सांगितले की, "या लढतीपूर्वी मी कॉंटाचे सामने पाहात होते. ती भविष्यातील चॅंपियन नक्कीच आहे. त्यामुळे तिला हरविल्याचा आनंद वाटतो. माझी सर्व्हिस फारशी चांगली होत नव्हती, पण मी निर्धार केला आणि खेळाचा आनंद लुटला.' कॉंटाने ही लढत म्हणजे आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव असल्याची भावना व्यक्त केली.

नदालचा धडाका कायम
नदालने धडाका कायम राखत कॅनडाच्या मिलॉस राओनीचवर 6-4, 7-6 (9-7), 6-4 अशी मात केली. त्याने तीन वर्षांत प्रथमच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. यापूर्वी 2014 मध्ये फ्रेंच विजेतेपद पटकावण्याच्या मार्गात त्याने ही कामगिरी केली होती. तिसरा मानांकित मिलॉस हा त्याचा आतापर्यंतचा सर्वांत खडतर प्रतिस्पर्धी होता, पण नदालने दोन तास 44 मिनिटांत तीन सेटमध्येच विजय मिळविला. त्याने येथे पाचव्यांदा आणि ग्रॅंड स्लॅम कारकिर्दीत 24व्या वेळी उपांत्य फेरी गाठली. ब्रिस्बेनमधील स्पर्धेत नदालला मिलॉसने हरविले होते. नदालने या पराभवाची परतफेड केली.

मोयांच्या "टीप' उपयुक्त
नदालने मिलॉसच्या बॅकहॅंडला लक्ष्य केले. माजी फ्रेंच विजेता देशबांधव कार्लोस मोया याचे नदाल मार्गदर्शन घेत आहे. मोया पूर्वी मिलॉसचे प्रशिक्षक होते. त्यांच्या "टीप' नदालला उपयुक्त ठरल्या.

नदालसमोर 15व्या मानांकित बल्गेरियाच्या ग्रिगॉर दिमित्रोवचे आव्हान असेल. ग्रिगॉरने डेव्हिड गॉफीनवर 6-3, 6-2, 6-4 असा विजय मिळविला. ग्रिगॉरला बल्गेरियाच्या प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे.

या कामगिरीवर माझा विश्‍वासच बसत नाही. देव चांगला आहे इतकेच मी म्हणू शकते. मी भारावून गेले आहे. पूर्वी जे काही वाईट घडले ते ठीक आहे, पण आता माझ्या आयुष्याचे सार्थक झाले आहे.
- मिर्याना ल्युचिच- बॅरोनी, क्रोएशियाची टेनिसपटू

loading image