esakal | T20 World Cup : आवेश, वेंकटेश आता नेट गोलंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

आवेश, वेंकटेश

T20 World Cup : आवेश, वेंकटेश आता नेट गोलंदाज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात फेरबदल करण्यात येत असल्याचे वृत्त दिवसागणिक प्रसिद्ध होत असताना बीसीसीआय नेट गोलंदाजांची संख्या वाढवत आहे. आता आवेश खान आणि वेंकटेश अय्यर यांची नेट गोलंदाज म्हणून निवड केली आहे.

दोन दिवसांपूर्वी काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकची अशीच नेट गोलंदाज म्हणून निवड केली होती. विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाला वेगवान गोलंदाजांची गरज लागली, तर उमरान आणि आवेश हे पर्याय म्हणून उपलब्ध असतील, अशी सोय बीसीसीआयने केली आहे. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने यास दुजोराही दिला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली संघातून खेळणाऱ्या आवेश खानने चांगलाच जलद मारा करून २३ विकेट मिळवल्या आहेत.

सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो हर्षल पटेल नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आवेश साधारतः ताशी १४५ किलोमीटर या वेगात गोलंदाजी करतो. तसेच ठणठणीत खेळपट्टीवर चांगला बाऊंसही तो मिळवत आहे. संघातील सपोर्ट स्टाफने त्याला नेहमीच पसंती दिलेली आहे, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने म्हटले आहे. वेंकटेश हा प्रामुख्याने फलंदाज आहे तो मधल्यमगती गोलंदाजीही करतो, परंतु त्याला हार्दिक पंड्यासाठी पर्याय म्हणून संघासोबत नेण्यात येणार आहे. आणि गरज भासली तर त्याची मुख्य संघात कधीही निवड होऊ शकते.

हार्दिक पंड्या संघासोबतच

सर्वात चर्चेत असलेला खेळाडू हार्दिक पंड्या संघासोबतच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता तो अष्टपैलू नव्हे, तर निव्वळ फलंदाज म्हणून संघात असेल, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचे म्हणणे आहे. मुळात त्याची निवड अष्टपैलू खेळाडू म्हणून करण्यात आली आहे. विश्वकरंडक स्पर्धेत हार्दिकचा उपयोग गोलंदाज म्हणूनही होणार आहे, असे मत निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी व्यक्त केले होते.

loading image
go to top