esakal | ICC T20I Rankings : बाबर फार्मात; टी-20 मध्ये विराटच्या दोन पावले पुढेच

बोलून बातमी शोधा

Babar Azam
ICC T20I Rankings : बाबर फार्मात; टी-20 मध्ये विराटच्या दोन पावले पुढेच
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने वनडे रँकिंगमध्ये अव्वलस्थान मिळवल्यानंतर आता टी-20 रँकिंगमध्येही आपली छोप उमटवली आहे. आयसीसीच्या नव्या टी-20 क्रमवारीत तो दुसऱ्या स्थानावर पोहचलाय. ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला मागे टाकत त्याने दुसऱ्या स्थानावर मजल मारलीये. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत बाबर आझमने एक शतक आणि दोन अर्धशतकाच्या जोरावर 210 धावा कुटल्या होत्या. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे मालिकेनंतर विराटला मागे टाकत त्याने आयसीसीच्या वनडे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. टी-20 रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेला बाबर आझम कसोटी क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. पहिल्या दहामध्ये विराटशिवाय लोकेश राहुल सातव्या स्थानावर असून त्याची एका स्थानाने घसरण झालीये.

आयपीएलच्या रंजक बातम्यांसाठी येथे क्लिक करा

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली वनडे रँकिंगमध्ये दुसऱ्या टी-20 आणि कसोटी क्रमावरीत पाचव्या स्थानावर आहे. टी-20 क्रमवारीत इंग्लंडचा डेविड मलान अव्वलस्थानी आहे. त्याच्या खात्यात 892 गुण जमा आहेत. बाबर आझम 844 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. फिंचला त्याने 14 गुणांनी मागे टाकल्याचे दिसून येते. फिंचच्या खात्यात 830 गुण जमा आहेत. न्यूझीलंडचा युवा फलंदाज डेवॉन कॉन्वे 774 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर विराट कोहलीचा नंबर लागतो. किंग कोहलीच्या खात्यात 762 गुण जमा आहेत.

हेही वाचा: लॉकडाऊनमध्येही IPL 'अनलॉक' का? जाणून घ्या यामागची कारणे

पाकिस्तानचा संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. 3 सामन्याच्या टी मालिकेतील पहिल्या सामन्यात बाबर आझमने केवळ 2 धावा केल्या होत्या. या मालिकेत आणखी 58 धावा करुन टी-20 मध्ये सर्वात जलद 2000 धावांचा टप्पा पार करण्याची संधी त्याच्याकडे आहे. जर त्याने ही कामगिरी फत्तेह केली तर तो विराट कोहलीला मागे टाकेल.

आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत दक्षिण अफ्रिकेचा फिरकीपटू तरबेज शम्सी पहिल्या स्थानावर आहे. त्याने 732 रेटिंगसह अव्वलस्थानावर कब्जा केलाय. विशेष म्हणजे दुसऱ्या क्रमांकावरही स्पिनरचाच बोलबाला असून राशीद खान 719 गुणांसह या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा एश्टन एगर तिसऱ्या तर आदिल राशीद चौथ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानच्या मजीब उर रहमान याने अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले आहे. टी-20 गोलंदाजी आणि ऑलराउंडरच्या यादीत एकाही भारतीयाला पहिल्या दहामध्ये स्थान मिळवता आलेले नाही.