esakal | लॉकडाऊनमध्येही IPL 'अनलॉक' का? जाणून घ्या यामागची कारणे

बोलून बातमी शोधा

lockdown and IPL

लॉकडाऊनमध्येही IPL 'अनलॉक' का? जाणून घ्या यामागची कारणे

sakal_logo
By
सुशांत जाधव

देशासह राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलय. लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर श्वास मोकळा होईल, हा विश्वास पुर्णत: गळून पडला असून ऑक्सिजनअभावी किती जणांचा श्वास गुदमरणार? अशी भीती दिवसागणिक प्रत्येकाच्या मनात घर करत आहे. लस विकसित झाल्याच्या भ्रमात असणाऱ्यांचाही भ्रमनिरास झाला असून पुन्हा घरात बसण्याची वेळ आलीये. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही, या विधानावर आता एकमत होताना दिसत असून आपण वर्तमान काळातून पुन्हा भूतकाळात चाललोय. हे सर्व सुरु असताना क्रिकेटच्या मैदानात रंगणारी आयपीएल स्पर्धा अनलॉक कशी? हा प्रश्नही अनेकांना पडला आहे. सोशल मीडिया चाळताना यासंदर्भातील अनेक प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या आणि हा लेख लिहावासा वाटला.

शाळा-कॉलेज ऑफिस, व्यापाऱ्यांची दुकाने बंद होत असताना आयपीएलच्या स्पर्धेला परवानगी का दिली? आयपीएल स्पर्धा ही अत्यावश्यक सेवेत मोडते का? यासारखे प्रश्न अनेकांना पडले आहेत. क्रिकेट चाहत्यांना कदाचित हा प्रश्न पडणार नाही. याचा अर्थ ज्यांना हा प्रश्न पडलाय त्यांना अक्कल नाही, असा अजिबात होत नाही. पण यामागे खूप मोठं आर्थिक गणित आहे. खेळासाठी आयुष्य घालवणाऱ्या खेळाडूसाठी ती अत्यावश्यक सेवा असू शकते. पण सगळंच बंद असताना यांना सूट का द्यायची? हा प्रश्न बेचैन करणारा असाच आहे. या लेखातून तुम्हाला आयपीएल अनलॉक असल्यामागचे कारण पटेल, असे नाही. पण आपण काही मुद्यांच्या आधारे यासंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करु.

हेही वाचा: IPL 2021: सेनापती जिंकला, पण संघ हरला! राहुलने कोहली-रोहितला टाकले मागे

मोठी आर्थिक उलाढाल

क्रिकेट हा खेळ काही जगभरात विखुरलेला नाही. हा खेळ आपल्या राष्ट्रीय खेळाचा भागही नाही. परंतु गेल्या काही वर्षांत याची लोकप्रियता तुफान वाढली आहे. ज्या मोजक्या देशात हा खेळ खेळला जातो त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सर्वात श्रीमंत संस्था म्हणून उदयास आलीये. ब्रॉडकास्टपासून ते खेळाडूंपर्यंत आणि स्पर्धेच्या आयोजनातून खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनापासून ते सरकारला कर स्वरुपात मिळणाऱ्या उत्पनापर्यंतची मोठी आर्थिक उलाढाल या खेळात होता. मागील वर्षी कोरोना काळात ऑस्ट्रेलियात होणारी टी-20 स्पर्धा रद्द झाली. त्यानंतर युएईच्या मैदानात आयपीएलचा महासंग्राम रंगला. ऑस्ट्रेलियन बोर्डाने बायोबबल वातावरण आणि नियोजनासाठी वाढणारा खर्च आवाक्याबाहेर असल्यामुळे जागतिक स्तरावरील स्पर्धा भरवण्यास असमर्थता दर्शवली होती. ही स्पर्धा रद्द झाल्यामुळे आयपीएल स्पर्धा भरवणे शक्य झाले. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, आयोजनाला सहकार्य करणाऱ्या अमिरात क्रिकेट बोर्डाला बीसीसीआयने तब्बल 98. 5 कोटी रुपये दिले. यावरुन आर्थिक उलाढाल किती मोठी आहे, याची कल्पना येते.

हेही वाचा: IPL 2021 : 4 कोटींचा हिरो ठरतोय झिरो

4000 कोटी रुपयांचे उत्पन्न

कोरोनाच्या संकटाचा बीसीसीआयला दुपट्टीने महागात पडली होती. देशात होणाऱ्या स्पर्धेच्या तुलनेत अमिरात बोर्डाला दिलेली रक्कम दुप्पट होती. मात्र कोरोनाच्या संकटात झालेल्या स्पर्धेत टीव्हीवरील जाहिरातीच्या माध्यमातून बीसीसीआयने 4000 कोटींचे उत्पन्न मिळवले. विशेष म्हणजे 2019 च्या तुलनेत TV Viewership मध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती बीसीसीआयचे खजीनदार अरुण धुमल यांनी दिली होती.

बीसीसीआय स्पर्धेसाठी किती टॅक्स पे करते

जिथं इनकम तिथ टॅक्स हा आलाच. बीसीसीआयही त्याला अपवाद नाही. 2008 ते 2018 च्या आकडेवारीनुसार बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेसाठी टॅक्स स्वरुपात जवळपास 3500 कोटी रुपये मोजले आहेत. अर्थात वर्षाला साधारणपणे बीसीसीआय टॅक्स स्वरुपात 350 कोटी रुपये जमा करते. हा सरकारला मिळणारा मोठा इनकम सोर्सच आहे.

खेळाडूंच्या कमाईवरील टॅक्स

आयपीएल स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना लाख आणि कोटीत पैसा मिळतो, हे आपल्याला माहितच आहे. आयकर विभागाच्या नियमानुसार खेळाडूंना प्रॉफेशनल टॅक्सही भरवा लागतो. याची वर्गवारी दोन गटात करण्यात आली आहे. भारतीय खेळाडूला कमाईच्या 10 टक्के तर परदेशी खेळाडूला 20 टक्के रक्कमही प्रोफेशनल टॅक्सच्या रुपात भरावी लागते. या स्पर्धेच आर्थिक चक्र हे सरकारच्या फायद्यासाठीही फिरते.

हेही वाचा: IPL 2021, KKR VS CSK: दोन रन आउटनं चेन्नई झाले टेन्शन फ्री

सरकार नियमानुसार खबरदारी घेण्याची सक्षमता

युएईमध्ये झालेल्या स्पर्धेत बीसीसीआयने बायो बबल आणि खेळाडूंची टेस्ट यासाठी मोठा खर्च केला होता. खबरदारीसाठी आवश्यक स्वतंत्र यंत्रणा उभारण्यासाठी बोर्ड सज्ज आहे. मागील वर्षी कोरोनाच्या काळात युएईमध्ये झालेल्या स्पर्धेत खेळाडू आणि स्टाफ मेंबर्सच्या कोरोना टेस्टसाठी बीसीसीआयने 9.49 कोटी खर्च केले होते. एवढेच नाही तर जैव सुरक्षा वातावरण तयार करण्यासाठी जवळपास 3 कोटींचा खर्च केला होता. ही स्पर्धा यशस्वी पार पाडून कोणत्याही परिस्थितीत स्पर्धा सुरळीत पाडण्यात सक्षम असल्याचे बीसीसीआयने दाखवून दिले होते. या सर्व कारणामुळेच पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली असताना आपल्याला आयपीएल अनलॉक असल्याचे दिसते.