पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ठरला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ; KKR च्या 'या' खेळाडूला टाकलं मागं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Babar Azam Rachael Haynes

बाबरनं वेस्ट इंडिजचा कसोटी कर्णधार क्रेग ब्रॅथवेट आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्स यांना मागं टाकत हा पुरस्कार जिंकलाय.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ठरला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं (ICC) मार्च 2022 साठी सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडूंची नावं (ICC Players of The Month) जाहीर केली आहेत. पुरुष विभागात पाकिस्तानचा (Pakistan) कर्णधार बाबर आझम (Babar Azam) विजयी झाला, तर महिला विभागात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर रॅचेल हेन्सनं (Rachael Haynes) बाजी मारलीय. बाबरनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia cricket Team) तिन्ही फॉरमॅटमध्ये शानदार कामगिरी केलीय. बाबरनं वेस्ट इंडिजचा कसोटी कर्णधार क्रेग ब्रॅथवेट (Kraigg Brathwaite) आणि ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार पॅट कमिन्स यांना मागं टाकत हा पुरस्कार जिंकलाय.

बाबरनं कसोटी मालिकेत एकूण 390 धावा केल्या आणि दुसऱ्या कसोटीत विक्रमी 196 धावा केल्या. त्याच्या याच खेळीमुळं पाकिस्तानी संघ दुसरी कसोटी अनिर्णित ठेवण्यात यशस्वी ठरला. बाबरनं त्यानंतर एकदिवसीय मालिकेतही चमकदार कामगिरी केलीय, इथं त्याच्या बॅटनं दोन शतकं झळकावली आहेत. व्होटिंग पॅनलचे सदस्य आणि वेस्ट इंडीजचे माजी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय डॅरेन गंगा म्हणाले, 'आस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बाबरनं हा पुरस्कार जिंकलाय. कर्णधार आणि यजमान या नात्यानं 24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा करणं, ही पाकिस्तानसाठी मोठी कामगिरी आहे.'

विश्वचषकात हेन्सची उत्कृष्ट कामगिरी

हेन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर, तिनं ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजयात मोलाची भूमिका बजावलीय. हेन्सनं महिला विश्वचषक 2022 मध्ये (Women's World Cup) आठ सामन्यांत 61.28 च्या सरासरीनं 429 धावा केल्या. तिच्या या कामगिरीमुळं ऑस्ट्रेलियाचा संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला आणि अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव करून विजेतेपद पटकावलं. ऑस्ट्रेलियन सलामीवीरानं 'प्लेअर ऑफ द मंथ' विजेतेपदाच्या शर्यतीत इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोन आणि दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोलवार्डला मागं टाकलंय.