World Cup 2019 : पावसाचीच प्रदीर्घ खेळी; बांगलादेश-श्रीलंका सामना रद्द 

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जून 2019

श्रीलंकेला दुसऱ्यांदा खेळण्याची संधी मिळाली नाही. यापूर्वी त्यांचा पाकिस्तानविरुद्धचा सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यांचे आता दोन गुण झाले आहेत. बांगलादेश संघाचे चार सामन्यातून तीन गुण झाले आहेत.

ब्रिस्टॉल : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी पावसानेच प्रदीर्घ खेळी केली. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका या मंगळवारच्या सामन्यात एकही चेंडू टाकला गेला नाही. दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणाचा फायदा झाला. 

पावसामुळे सामना रद्द होण्याची या स्पर्धेतील ही तिसरी वेळ ठरली. आजच्या सामन्यात पावसामुळे नाणेफेकदेखील होऊ शकली नाही. अशा पद्धतीने सामना न होण्याची या स्पर्धेतील दुसरी वेळ ठरली. एका विश्‍वकरंडक स्पर्धेत अशा पद्धतीने सामने रद्द करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. 

श्रीलंकेला दुसऱ्यांदा खेळण्याची संधी मिळाली नाही. यापूर्वी त्यांचा पाकिस्तानविरुद्धचा सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यांचे आता दोन गुण झाले आहेत. बांगलादेश संघाचे चार सामन्यातून तीन गुण झाले आहेत. 

आजच्या दिवशी सकाळी 10.30 वाजताच पावसाला सुरवात झाली होती. दोन्ही संघ दुपारपर्यंत हॉटेलमध्येच थांबले होते. त्यानंतर श्रीलंका संघ प्रथम मैदानावर आला. त्यांनी आउटफिल्डवर वर्क-आउट केले. सामना रद्द करण्यापूर्वी तीन वेळा पाहणी करण्यात आली. पाऊस थांबला ती ग्राउंड स्टाफ प्रथण कव्हरवरील पाणी हटविण्याचे काम करताना दिसत होते. पण, प्रत्येक वेळी पावसामुळे त्यांना काम थांबवावे लागत होते. सामना वीस षटकांचा खेळविण्यासाठी प्रत्येकाचा आटापिटा होता. पण पावसाने सर्वांच्या इच्छेवर पाणी फिरवले. सामना अधिकाऱ्यांनी दु. 1.55 वाजता सामना रद्द केल्याची घोषणा केली. सामना रद्द झाल्यामुळे बांगलादेश निराश असेल, पण दुसऱ्या बाजूने त्यांना दिलासादेखील मिळाला. दोन अर्धशतके आणि एक शतक इतके सातत्य राखणारा त्यांचा शखिब अल हसन मांडीच्या दुखापतीने या सामन्यात खेळू शकणार नव्हता. आता पुढील सामन्यापर्यंत त्याला पुरेशी विश्रांती मिळेल. 

प्रतिस्पर्ध्यांची आगामी लढत - श्रीलंका वि. ऑस्ट्रेलिया (15 जून, लंडन). बांगलादेश : वि. वेस्ट इंडीज (17 जून, टॉंटन).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangladesh vs Sri Lanka Teams Share Points After Another Wash-out in Bristol