World Cup 2019 : शकिब अल हसनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे बांगलादेश विजयी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

अर्धशतक आणि कमी धावात पाच बळी अशी वर्ल्डकपमधील विक्रमी कामगिरी करणाऱ्या शकिब अल हसनच्या अष्टपैलू खेळामुळे बांगलादेशने अफगाणिस्तानचा 62 धावांनी पराभव करून विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतले आपले आव्हान कायम ठेवले.

वर्ल्ड कप 2019 : साऊदम्टन : अर्धशतक आणि कमी धावात पाच बळी अशी वर्ल्डकपमधील विक्रमी कामगिरी करणाऱ्या शकिब अल हसनच्या अष्टपैलू खेळामुळे बांगलादेशने अफगाणिस्तानचा 62 धावांनी पराभव करून विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतले आपले आव्हान कायम ठेवले. 

भारतीय फलंदाजांची सव्वादोनशे धावा करताना दमछाक झाली, त्याच मैदानावर बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्ध 7 बाद 262 धावांपर्यंत मजल मारली त्यानंतर अफगाणिस्तानला 200 धावांत गुंडाळले. संथ खेळपट्टीवर पहिले दोन फलंदाद 82 धावांत बाद झाल्यावर बांगलादेशचा डाव सावरणाऱ्या शकिब अल हसनने 51 धावांची खेळी केली त्यानंतर गोलंदाजीत 29 धावांत 5 विकेट मिळवले. 2011 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताच्या युवराज सिंगने अर्धशतक आणि पाच विकेट मिळवले होते. 

भारताला झुंझवणाऱ्या महम्मद नबीला शुन्यावर बाद करून शकिबने अफगाणिस्तानच्या आव्हानातील हवा काढली परंतु, सलामीवीर गुलबदिन नबीने 47 आणि समाउल्ला शिनवारी याने 49 धावा करून लढत दिली, परंतु शकिबच्या फिरकीसमोर अफगाणिस्तानची फलंदाजी कोलमडली. 

तत्पूर्वी, शकिब हसन आणि मुशफिकर यांनी भारतीय फलंदाजांनी केलेल्या चुका टाळल्या आणि सावध अर्धशतके केली. शनिवारी याच मैदानावर ढगाळ वातावरण आणि संथ खेळपट्टी याचा फायदा घेत अफगाणच्या गोलंदाजांनी भारताच्या भरभक्कम फलंदाजीला वेसण घातले. आजही प्रथम गोलंदाजी करण्याच्या मिळालेल्या संधीचा फायदा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु बांगलादेशच्या फलंदाजांनी भारतीय डावापासून बोध घेतला; त्यामुळे त्यांना अडीचशेच्या पलीकडे मजल मारता आली. 

शकिब अल हसन आणि मुशफिकर यांच्या फलंदाजीतून दिसून आले. या दोघांनी डाव सावरताना धावांची गती कमी होणार नाही याची काळजी घेतली. शकिबला एकच चौकार मारता आला, तरी त्याचा स्ट्राईक रेट 73 चा होता. 
अर्धशतकानंतर शकिब मुजीबच्या चेंडूवर पायचीत झाला. त्यानंतर मुशफिकरने एक बाजू सांभाळली. 35 षटकांनंतर बांगलादेशने गिअर बदलण्यास सुरुवात केली. महम्मदुल्ला आणि मोसादेक हुसैन यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मुशफिकरनेही आक्रमक फटके मारण्यास सुरुवात केली. तो बाद झाला तेव्हा बांगलादेशने अडीचशे धावा केल्या होत्या. 

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश : 50 षटकांत 7 बाद 262 (तमिम इक्‍बाल 36, शकिब अल हसन 51 -69 चेंडू, 1 चौकार, मुशफिकर रहिम 83 -87 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, मोहम्मदुल्ला 27 -38 चेंडू, 1 चौकार, मोसादेक हुसैन 35 -24 चेंडू, 4 चौकार, मुजीब उर रहमान 10-0-39-3, गुलबदीन नबी 10-1-56-2). वि. वि. अफगाणिस्तान ः 47 षटकांत सर्वबाद 200 (गुलबदिन नबी 47, समिउल्ला शिनवारी 49, मुश्‍तफिजुर रहिम 8-1-32-2, शकिब अल हसन 10-1-29-5) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangladesh wins against Afghanistan in World Cup 2019