राज्याची बंदी, पण राष्ट्रीय कबड्डी संघात

राज्य कबड्डी संघटनेने बंदी घातलेल्या खेळाडूंची भारतीय कबड्डी संघात निवड करण्यात आली आहे
राज्य कबड्डी संघटनेने बंदी घातलेल्या खेळाडूंची भारतीय कबड्डी संघात निवड करण्यात आली आहे

मुंबई : राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ साखळीत बाद झाल्यानंतर नेमलेल्या शिस्तपाल समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने तीन खेळाडू, मार्गदर्शक, तसेच व्यवस्थापक यांच्याविरुद्ध कारवाई केली होती. त्यात पाच वर्षांची बंदी घातलेल्या दीपिका जोसेफ हीची भारतीय महिला कबड्डी संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे, तर दोन वर्षे बंदी असलेल्या स्नेहल शिंदे हिचीसुद्धा दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (सॅफ) निवडलेल्या या संघात निवड करण्यात आली आहे. सर्वांत धक्कादायक म्हणजे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराजित झालेल्या महाराष्ट्र पुरुष संघातील एकाही खेळाडूची राष्ट्रीय संघात निवड झालेली नाही.

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या संघाचे सराव शिबिर झाल्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक झाली होती. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शिस्तपालन समितीची बंदीची शिफारस स्वीकारण्यात आली होती. त्यानंतर दोनच दिवसांत या निर्णयाची माहिती राज्य कबड्डी संघटनेने भारतीय कबड्डी महासंघावरील नियुक्त निरीक्षक निवृत्त न्यायाधीश एस. पी. गर्ग यांना दिली होती. मात्र भारतीय कबड्डी सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार याचा उल्लेखही निवड समिती बैठकीत झाला नाही. गर्ग निवड समितीचे निमंत्रक होते. राज्य संघटनेकडून पत्रच आले नसल्याचे महासंघातील कार्यालयातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

रोहा येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र उपांत्य फेरीत सेनादलाकडून पराजित झाला होता. त्यापूर्वीच्या फेडरेशन स्पर्धेत महाराष्ट्र उपांत्य फेरीत हरला होता. प्रो कबड्डीतही महाराष्ट्रातील खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली होती. त्यानंतरही महाराष्ट्राचा एकही खेळाडू राष्ट्रीय संघात कसा नाही, अशी विचारणा होत आहे. त्याचवेळी राज्यातील कबड्डी मार्गदर्शक साखळीत गारद झालेल्या राज्याच्या संघातील दोघींची निवड होते, सातत्याने राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल संघात असलेल्या राज्याच्या पुरुष संघातील एकही खेळाडू कसा नाही हे सगळेच न उमजणारे आहे, अशी खंत व्यक्त करीत आहेत.

भारतीय संघ
पुरुष ः नितेश कुमार, नवीन कुमार (सेनादल), विशाल भारद्वाज (हिमाचल प्रदेश), सुनील कुमार, परवेश (रेल्वे),  पवन कुमार (उपकर्णधार), विकाश (रेल्वे), परदीप, अमित, सुरेंदर (हरियाणा), दीपक (कर्णधार - राजस्थान), दर्शन (दिल्ली). मार्गदर्शक ः बलवान सिंग तसेच आशन कुमार. व्यवस्थापक ः जयवीर शर्मा.
महिला ः रितू कुमारी (बिहार), नीशा (दिल्ली), पुष्पा (हिमाचल प्रदेश), प्रियांका (कर्णधार) साक्षी कुमारी (दोघी हरियाणा), पायल, रितू, सोनाली शिंगटे (तिघी रेल्वे), दीपिका जोसेफ (उपकर्णधार), स्नेहल शिंदे (दोघी महाराष्ट्र). ममता कुमारी (राजस्थान), हरविंदर कौर (पंजाब). मार्गदर्शिका ः सुनील डबास, बनानी साहा. व्यवस्थापिका ः शैलजा जैन.

राज्याने खेळाडूंवरील बंदीचे पत्र भारतीय कबड्डी महासंघाला पाठवले होते. त्याबाबतचा निर्णय त्यांचा आहे; पण ते आता हे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत खेळले, शिबिरासाठी निवड झाली, त्या वेळी त्यांच्यावर बंदी नव्हती, असे म्हणू शकतात. आता आपण त्यांना घेऊ नका, हे तर सांगू शकत नाही. भारतीय कबड्डी महासंघाची ८ तारखेला बैठक आहे, तेव्हा बघू काय होते. आता गटातून बाहेर न पडलेल्या संघातील दोघींची निवड होते. यापूर्वीच्या आपला संघ कायम निर्णायक लढतीत खेळत असला तरी एकीची निवड होईल की नाही हा प्रश्न असे. यापेक्षा धक्कादायक म्हणजे उपांत्य फेरी खेळलेल्या आपल्या पुरुष संघातील एकही संघात येत नाही. 
- आस्वाद पाटील, राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com