हो मी केलं फिक्सिंग; कमबॅक करण्यासाठी दिली कबुली

वृत्तसंस्था
Tuesday, 20 August 2019

पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये स्पॉट फिक्‍सिंग केल्याची शारजील खान याने अखेर कबूली दिली आहे. त्यामुळे आता त्याला पुनरागमन करण्याची संधी दिली दाते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये स्पॉट फिक्‍सिंग केल्याची शारजील खान याने अखेर कबूली दिली आहे. त्यामुळे आता त्याला पुनरागमन करण्याची संधी दिली दाते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सोमवारी शारजीलने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे त्याचा माफीनामा पाठविला. 2017मध्ये केलेल्या स्पॉट फिक्सिंगप्रकरणी त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली. क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी त्याला भ्रष्टाचार प्रतिबंधक पुनर्वसन कार्यक्रम पूर्ण करावा लागणार आहे. 

भ्रष्टाचार केला आहे अशी कबूली दिलीस तरच तुला पुनरागमन करण्याची संधी दिली जाईल असे पाकिस्तान क्रिकेटने यापूर्वीच त्याला बजावले होते. पाकिस्तान लीगमध्ये स्पॉट फिक्‍सिंग केल्याबद्दल शारजीलवर पाच वर्षांची बंदी ऑगस्ट 2017 मध्ये घालण्यात आली होती. आता यातील निम्मी बंदी रद्द होऊ शकेल, असेही बंदीचा निर्णय घालताना पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक लवादाने सांगितले होते. इस्लामाबाद युनायटेडकडून खेळलेल्या शारजीलसह खलीद लतीफ, मोहम्मद इरफान, मोहम्मद नवाझ, नासीर जमशेद आणि शाहझैब हसन दोषी ठरले होते.

शारजील सप्टेंबरमध्ये होणाऱ्या कैद ए आझम करंडक स्पर्धेत खेळू शकेल; पण त्याने चूक मान्य करावी; तसेच त्याबद्दल माफीही मागावी, असे पाक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यामुळेच आता कदाचित त्याला कैद ए आझम करंडक स्पर्धेत सहभाग घेता येईल. 

शारजील पुनर्वसन प्रक्रियेस जाण्यास तयार आहे, असे यापूर्वीच पाक मंडळास कळवण्यात आले आहे. पुनर्वसन प्रक्रियेतील सहभाग म्हणजेच चूक मान्य करून माफी मागणे आहे, असा दावा शारजीलचे वकील शैघान एजाझ यांनी केला आहे. शारजीलने त्याच्यावरील पाच आरोप स्वीकारले होते. आता त्याने आपला स्पॉट फिक्‍सिंगमध्ये सहभाग होता असेही मान्य केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banned Pakistan Opener Sharjeel Khan Requests For Forgiveness For Spot Fixing