बीसीसीआय निवडणूक 22 ऑक्‍टोबरला 

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मे 2019

"बीसीसीआय' तसेच संलग्न संघटनांवर नियंत्रण प्रशासक किंवा न्यायालयाचे नसावे, तर निवडून आलेल्या पदाधिकाऱ्याचे हवेत, असे काही दिवसांपूर्वीच न्यायालयीन मित्र नरसिम्हा यांनी सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांतच प्रशासकीय समितीची बैठक झाली. त्यात भारतीय मंडळाची निवडणूक 22 ऑक्‍टोबरला होईल. त्यापूर्वी संलग्न संघटनांची निवडणूकप्रक्रिया 14 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. संलग्न संघटना आपले मंडळावरील प्रतिनिधींची नावे 23 सप्टेंबरपर्यंत जाहीर करतील. 

मुंबई : भारतीय क्रिकेट मंडळावरील शिफारसींबाबत संलग्न संघटनांनी न्यायालयीन मित्र नरसिम्हा यांना आपली भूमिका सांगितल्यावर चक्रे फिरू लागली आणि अखेर भारतीय क्रिकेट मंडळावरील प्रशासकीय समितीस झुकावे लागले. त्यामुळे लोढा समितीच्या निर्णयापासून सूत्रे असलेल्या प्रशासकीय समितीऐवजी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) नियुक्त पदाधिकारी ऑक्‍टोबरमध्ये येतील, असे चित्र निर्माण झाले आहे. 

"बीसीसीआय' तसेच संलग्न संघटनांवर नियंत्रण प्रशासक किंवा न्यायालयाचे नसावे, तर निवडून आलेल्या पदाधिकाऱ्याचे हवेत, असे काही दिवसांपूर्वीच न्यायालयीन मित्र नरसिम्हा यांनी सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांतच प्रशासकीय समितीची बैठक झाली. त्यात भारतीय मंडळाची निवडणूक 22 ऑक्‍टोबरला होईल. त्यापूर्वी संलग्न संघटनांची निवडणूकप्रक्रिया 14 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. संलग्न संघटना आपले मंडळावरील प्रतिनिधींची नावे 23 सप्टेंबरपर्यंत जाहीर करतील. 

संलग्न संघटनांनी 80 हून अधिक याचिका न्यायालयात सादर केल्यामुळे न्यायमित्रांना त्यांच्याबरोबर चर्चा करण्यास सांगितले होते. न्यायमित्रांनी संघटनांबरोबर चर्चा केल्यावर जवळपास 30 संघटनांनी लोढा समितीच्या कक्षेत येण्यास मंजुरी दिली आहे. न्यायमित्रांनी त्यांना एक सूट दिली आहे. भारतीय मंडळातील कार्यकारी समिती नऊ सदस्यांचीच असेल. हेच राज्य संघटनेत अपेक्षित होते; मात्र याच्या अंमलबजावणीत काही अडथळे आहेत. त्यामुळे संलग्न संघटनातील कार्यकारिणी 19 सदस्यांची असेल. त्यात तीन नियुक्त सदस्यही असतील.

न्यायमित्रांनी निवडणुकीसाठी योग्य कालावधी असल्याचे सांगितले. त्यानुसार निवडणूक 22 ऑक्‍टोबरला होत आहे, असे राय यांनी सांगितले. 

निवडणूक कार्यक्रम 
- 30 जूनपर्यंत ः निवडणूक अधिकाऱ्यांची भारतीय मंडळाकडून नियुक्ती. भारतीय मंडळाबरोबर चर्चा करून निवडणूक कार्यपद्धती तयार करणे आणि त्याची माहिती संघटनांना कळवणे 
- 1 जुलै ः संलग्न संघटनांकडून निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती 
- 14 ऑगस्ट ः संलग्न संघटनांच्या निवडणुकीसाठी यादी; तसेच निवडणूक कार्यपद्धती तयार करणे 
- 14 सप्टेंबर ः संलग्न संघटनांच्या निवडणुकांची पूर्तता 
- 23 सप्टेंबर ः संलग्न संघटनांनी प्रतिनिधींची यादी भारतीय मंडळास कळवणे 
- 30 सप्टेंबर ः भारतीय मंडळाच्या निवडणुकीसाठी पात्र उमेदवारांची यादी तयार करणे 
- 22 सप्टेंबर ः भारतीय मंडळाची निवडणूक 

परत निवडणुका, क्रिकेट संघटनांना धक्का 
भारतीय क्रिकेट मंडळाच्या प्रशासकीय समितीने मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना संलग्न संघटनांचीही निवडणूक जाहीर केल्याचा संघटनांना धक्का बसला आहे. लोढा समितीच्या शिफारसीनुसार आम्ही एखाद-दीड वर्षांपूर्वी निवडणूक घेतली होती. आता या सदस्यांची मुदत संपण्यापूर्वीच कशी निवडणूक घेणार, अशी विचारणा संलग्न संघटनांचे प्रतिनिधी करीत आहेत. दिल्ली संघटनेची निवडणूक लोढा समितीनुसार 2018 मध्ये झाली. परत निवडणूक कशाला, अशी विचारणा दिल्ली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI elections as per new constitution on October 22