World Cup 2019 : विश्‍वकरंडक संघ निवडीत अष्टपैलूत्वाला प्राधान्य 

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 एप्रिल 2019

भारतीय संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, विजय शंकर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, महंमद शमी, जसप्रित बुमरा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल

मुंबई : बहुचर्चित आणि आयपीएलच्या धामधुमीतही सर्वांचे लक्ष लागून राहिलेली विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेची विराट सेना निवडण्यात आली. रिषभ पंतऐवजी अनुभवी दिनेश कार्तिक आणि अंबाती रायडूऐवजी अष्टपैलू विजय शंकर यांना पसंती देण्यात आली; तर रवींद्र जडेजालाही प्राधान्य देण्यात आले. 

इंग्लंडमधील हवामान आणि परिस्थिती कशी असेल याचा विचार एम. एस. के. प्रसाद यांच्या निवड समितीने केला आणि त्याप्रमाणे संघाची रचना केली. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड दौरा आणि त्यानंतर मायदेशातील ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका यातील कामगिरीनुसार निवड समिती; तसेच कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संघातील शिलेदार जवळपास निश्‍चित करत आणले होते. एक-दोन जागांचा प्रश्‍न होता, असे वारंवार सांगण्यात येत होते आणि तसेच घडले. 

रिषभ पंत-दिनेश कार्तिक आणि विजय शंकर-अंबाती रायडू यांच्यात चुरस होती. त्याप्रमाणे एकेकाला संधी मिळाली; परंतु यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव असे दोन प्रमुख फिरकी गोलंदाज असताना आणि केदार जाधव बदली गोलंदाज असताना रवींद्र जडेजाची निवड करताना निवड समिती; तसेच कोहली-शास्त्री यांनी अष्टपैलूत्वाला अधिक प्राधान्य दिले. 

पंतची वेळ येईल 
रिषभ पंतऐवजी दिनेश कार्तिक याबाबच स्पष्टीकरण देताना निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले, ""पंत हा हरहुन्नरी खेळाडू आहे. फलंदाजीत त्याने चांगली चमकही दाखवलेली आहे; परंतु ही विश्‍वकरंडक स्पर्धा आहे. महेंद्रसिंह धोनी एखादा सामना आणि महत्त्वाचा सामना खेळू शकला नाही, तर अशा वेळी यष्टीरक्षण अव्वल असणे आवश्‍यक आहे. म्हणून आम्ही कार्तिकला प्राधान्य दिले. पंत यष्टीरक्षणात सुधारणा करत आहे. त्याची वेळ येईल.'' प्रसाद हे स्वतः माजी यष्टीरक्षक होते. रवींद्र जडेजाकडे अष्टपैलू गुणवत्ता असल्यामुळे त्याला प्राधान्य देण्यात आल्याचे प्रसाद म्हणाले. 

असा आहे संघ : 
फलंदाज : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन. के. एल. राहुल. केदार जाधव. 
यष्टीरक्षक : महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक. 
अष्टपैलू : हार्दिक पंड्या, विजय शंकर, रवींद्र जडेजा. 
वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमरा, भुवनेश्‍वर कुमार, महंमद शमी. 
फिरकी गोलंदाज : यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव. 

सात नवे चेहरे
- संघातील दोघांना (विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी) विश्‍वकरंडक जिंकण्याचा अनुभव
- अन्य सहा जणांना (शिखर धवन, रोहित शर्मा, महम्मद शमी, भुवनेश्‍वर कुमार, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक) विश्‍वकरंडकाचा अनुभव
- केएल राहुल, विजय शंकर, केदार जाधव, हार्दिक पंड्या, यझुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा या सात जणांची पहिलीच स्पर्धा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI selected Indian cricket team for World Cup 2019