झहीर खान नव्हे; भारत अरुणच नवे गोलंदाजी प्रशिक्षक...

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जुलै 2017

""झहीर व द्रविड यांना भारतीय संघास आणखी किती दिवस सहाय्य करण्याची इच्छा आहे, यावर सर्व अवलंबून आहे. त्यांच्या सेवेचे स्वागत आहे,'' अशी प्रतिक्रिया शास्त्री यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्त केली आहे. द्रविड व झहीर यांना हा एक प्रकारचा इशाराच असल्याचे मानले जात आहे.

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाच्या "गोलंदाजी प्रशिक्षक'पदी अखेर तमिळनाडूचे माजी मध्यमगती गोलंदाज भारत अरुण यांची वर्णी लागली आहे.

भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे ऑगस्ट 2014 ते ऑगस्ट 2016 या काळात संघ संचालक असताना, त्यांच्या मर्जीतले असलेले अरुण यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. याचबरोबर, टीम इंडियाचे सध्याचे फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांना सह प्रशिक्षकपदी बढती देण्यात आली आहे. अरुण व बांगर यांचा कार्यकाळ आता 2019 मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत असणार आहे.

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सल्लागार समितीने या पदांसाठी माजी खेळाडू राहुल द्रविड व झहीर खान यांच्या नावाची शिफारस केली होती. या शिफरशीस वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचे या नव्या नेमणुकीबरोबर स्पष्ट झाले आहे.

""झहीर व द्रविड यांना भारतीय संघास आणखी किती दिवस सहाय्य करण्याची इच्छा आहे, यावर सर्व अवलंबून आहे. त्यांच्या सेवेचे स्वागत आहे,'' अशी प्रतिक्रिया शास्त्री यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्त केली आहे. द्रविड व झहीर यांना हा एक प्रकारचा इशाराच असल्याचे मानले जात आहे.

कर्णधाराला नको असल्यामुळे कुंबळे यांनी प्रशिक्षकपद सोडले, त्यानंतर शास्त्री यांची नियुक्ती झाली. त्याच वेळी सचिन-गांगुली-लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीने द्रविड आणि झहीर यांची अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीचा सल्लागार म्हणून शिफारस केली. विशेष करून झहीरच्या नियुक्तीला शास्त्री यांचा विरोध होता.

या पार्श्वभूमीवर अगोदर अनिल कुंबळे, आता राहुल द्रविड आणि झहीर खान यांच्या उघडपणे होत असलेल्या मानहानीबद्दल क्रिकेट प्रशासकीय समितीचेच माजी सदस्य रामचंद्र गुहा यांनी खडे बोल सुनावले होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat Arun is India's bowling coach, Sanjay Bangar assistant coach