पाकमधील लढत सोडण्यास महेश भूपती सांगत होता

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

डेव्हिस करंडक स्पर्धेतील भारताची लढत पाकिस्तानात होणार नाही हे निश्‍चित झाल्यानंतर आपल्याकडून कर्णधारपद काढून घेतल्याबद्दल महेश भूपतीने संघटनेस धारेवर धरले होते. आता टेनिस संघटनेने प्रति रॅलीज करताना भूपतीने आपण तसेच आघाडीचे खेळाडू पाकिस्तानात जाणार नसल्याचीच भूमिका घेतली असल्याचा दावा करण्यात आला.

नवी दिल्ली / मुंबई : डेव्हिस करंडक स्पर्धेतील भारताची लढत पाकिस्तानात होणार नाही हे निश्‍चित झाल्यानंतर आपल्याकडून कर्णधारपद काढून घेतल्याबद्दल महेश भूपतीने संघटनेस धारेवर धरले होते. आता टेनिस संघटनेने प्रति रॅलीज करताना भूपतीने आपण तसेच आघाडीचे खेळाडू पाकिस्तानात जाणार नसल्याचीच भूमिका घेतली असल्याचा दावा करण्यात आला.

पाकिस्तानातील डेव्हिस करंडक लढतीबाबत भारतीय टेनिस संघटना आणि आंतरराष्ट्रीय महासंघात पत्रव्यवहार सुरू होता. त्यावेळी कधीही लढत पाकिस्तानबाहेर होऊ शकते असे संकेत देण्यात आले नव्हते. भारतीय संघातील कोणीही अव्वल खेळाडू पाकिस्तानात जाण्यास तयार नसल्याचे सप्टेंबरमध्ये भूपतीने संघटनेस कळवले होते. एवढेच नव्हे, तर लढतीचे ठिकाण बदलण्यासाठी प्रयत्न करण्यास सूचवले. हे शक्‍य न झाल्यास लढतीत पराभव मान्य करण्याची सूचना केली होती, असे भारतीय टेनिस संघटनेचे सचिव हिरोण्यम चॅटर्जी तसेच संघटनेचे सीईओ आखौरी बिश्‍वदीप यांनी सांगितले.

भारत-पाक लढतीसाठी केवळ खास निमंत्रित उपस्थित असतील, असे पाकने ऑक्‍टोबरच्या सुरुवातीस सांगितले होते. कुटुंबीय तयार नसल्याने पाकला जाणार नाही, असे भूपतीने कळवल्याने पेसबरोबर संपर्क साधला. त्याने कर्णधार होण्याची तयारी दाखवली, पण त्यावेळी तो खेळाडूही असण्याची शक्‍यता होती. पाकमध्ये लढत असताना कर्णधारावर अतिरिक्त जबाबदारी असते, हे लक्षात घेऊन राजपाल याची निवड झाली, असे चॅटर्जी यांनी सांगितले.

पाकमध्येच लढत झाल्यास त्यात पराभव मान्य करण्याची भूपतीची सूचना होती. त्यास आम्ही तयार नव्हतो. ही लढत खूपच महत्त्वाची होती. आम्ही त्याचवेळी पाकिस्तान तसेच आंतरराष्ट्रीय महासंघावर सुरक्षेच्या मुद्द्यावरून खूपच दडपण आणत होतो. मात्र, त्याचवेळी पाकिस्तानात लढत होईल या दिशेने तयारीही करण्याची गरज होती, असे चॅटर्जी यांनी सांगितले.

भारताने पाकिस्तानातील लढत सोडून द्यावी असे मला वाटत नव्हते. मी महेश भूपती तसेच लिअँडर पेसचा आदर करतो. लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा हक्क आहे. पाकिस्तानात कोणाची जाण्याची तयारी असेल तर तेही स्वीकारायला हवे. पाकमध्ये खेळण्यास तयार असलेले आणि त्यांना पराजित करू शकतील, अशा खेळाडूंची निवड महत्त्वाची होती.
- रोहित राजपाल, भारतीय कर्णधार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhupathi had asked AITA not to play in pakistan