esakal | बोपण्णाला वगळले हा कारवाईचा भाग
sakal

बोलून बातमी शोधा

बोपण्णाला वगळले हा कारवाईचा भाग

बोपण्णाला वगळले हा कारवाईचा भाग

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चेन्नई - डेव्हिस करंडक संघातून रोहन बोपण्णाला वगळल्याबाबत भारतीय टेनिस संघटनेने प्रथमच खुलासा करताना देशासाठी खेळण्यास प्राधान्य न दिल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, असे मंगळवारी स्पष्ट केले. बोपण्णाने मात्र यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

गेल्यावर्षी सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या स्पेनविरुद्धच्या लढतीत बोपण्णाने दुखापतीमुळे ऐनवेळी संघातून माघार घेतली होती. मात्र, त्याच्या दुसरऱ्याच दिवशी तो मित्रांसह पार्टीत नाच करत असल्याचा व्हिडिओ त्यानेच इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. त्याची हीच कृती कळीची ठरली आहे. संघटनेने याच घटनेवर बोट ठेवत बोपण्णाला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला. 'आम्ही आमचे डोळे झाकले नाहीत, जर एखाद्या खेळाडूला देशासाठी खेळण्याची इच्छा नसेल तर त्याला संघात स्थान दिले जाणार नाही. महत्त्वाच्या प्रसंगी खेळाडूंनी देशासाठी सर्वस्व देण्याची गरज असताना दुखापतीचे कारण देऊन माघार घेणे चुकीचे आहे,'' असे अखिल भारतीय टेनिस संघटनेने म्हटले आहे.

बोपण्णाने मात्र आपल्या कृतीचे समर्थन करताना मी नाचू शकतो याचा अर्थ मी खेळण्यासाठी 100 टक्के तंदुरुस्त आहे असा होत नाही, असे सांगितले. तो म्हणाला, 'मला खरोखरच दुखापत झाली होती. मला चालता, पळता येत होते; परंतु जर सामन्यात 5 सेट खेळण्याची गरज भासली असती तर मी तंदुरुस्त नव्हतो. देशासाठी खेळण्याला मी नेहमीच प्राधान्य दिले आहे; परंतु डॉक्‍टरांच्या सल्ल्याचा मान राखणे आवश्‍यक होते.'' बोपण्णाने अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या निवड पद्धतीवरसुद्धा प्रश्‍न उपस्थित केला आहे. तो म्हणाला, 'स्पेनने प्ले-ऑफ लढतीसाठीसुद्धा सर्वोत्तम संघाची निवड केली होती. विजेत्या संघांकडून या गोष्टी शिकण्यासारख्या असून, आपणही छोटे छोटे वाद बाजूला ठेवून सर्वोत्तम संघाची निवड करण्याची गरज आहे.''