Vinesh Phogat : विनेश फोगाटने चौकशी समितीवरच केले गंभीर आरोप; ब्रिजभूषण प्रकरणाला वेगळे वळण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brij Bhushan Sharan Singh  Vinesh Phogat

Vinesh Phogat : विनेश फोगाटने चौकशी समितीवरच केले गंभीर आरोप; ब्रिजभूषण प्रकरणाला वेगळे वळण?

Brij Bhushan Sharan Singh Vinesh Phogat : भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे प्रकरण काही केल्या संपण्याचे नाव घेत नाहीये. भारताच्या आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करत ठिय्या आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं. हे आंदोलन शांत करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने चौकशी आजी माजी खेळाडूंची समिती नेमली होती. आता या समितीवरच आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंपैकी एक विनेश फोगाटने आरोप केले आहेत.

विनेश फोगाटने ब्रिजभूषण प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीतील सदस्यच संवेदनशील आणि गोपनीय माहिती माध्यमांना पुरवत असल्याचा आरोप केला. याचबरोबर फोगाने या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. याबाबतचे ट्विट विनेश फोगाटने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केले आहे. फोगाटने या ट्विटद्वारे समितीतील व्यक्तीचा महिलांबाबतच्या दृष्टीकोणाबाबत देखील भाष्य केले.

भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश आपल्या ट्विटमध्ये म्हणते, 'नुकेच माझ्या लक्षात आले की चौकशी समितीमधील एक खेळाडू सदस्य हा लैंगिक अत्याचाराविरुद्धच्या तक्रारीतबाबतची माहिती माध्यमांना पुरवत आहे. एक खेळाडू म्हणून ही खूप निराशाजनक बाब आहे. एक सहकारी खेळाडू जो चौकशी समितीचा सदस्य आहे. कोणताही विचार न करता अशा गोष्टी करत आहे. या वर्तनुकीतून या खेळाडूचा महिलांबाबतचा दृष्टीकोण कसा आहे हे दिसून येते.'

विनेश आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणते की, 'विशेष म्हणजे या खेळाडूचा समावेश हा भारतीय कुस्तीगीर परिषदेच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीवर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या दोन्ही समितीत आहे. यामुळे समितीच्या कार्यपद्धतीबाबत अविश्वास निर्माण होतोय. या समितीने निराशा केल्याची भावना माझ्या मनात आहे. मी या समितीतील या खेळाडू सदस्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करते. हा सदस्य आपल्या पदाचा गैरवापर करत आहे. त्यामुळे त्याला त्वरित समितीमधून काढून टाकले पाहिजे.'

(Sports Latest News)

हेही वाचा : डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही