भारताचा पाकवर 124 धावांनी दणदणीत विजय

वृत्तसंस्था
रविवार, 4 जून 2017

संयम व आक्रमकता यांचा सुरेख संगम साधत भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. युवराज बाद झाल्यानंतर फलंदाजीस आलेल्या हार्दिक पांड्या (नाबाद 20 धावा, 6 चेंडू) यानेही अखेरच्या षटकात सलग तीन टोलेजंग षटकार मारत या वाहत्या गंगेत हात धुवून घेतला

लंडन - भारतीय फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर गोलंदाजांनीही पाकिस्तानच्या डावाला रोख लावत 33.4 षटकांत 9 गडी बाद करत 164 धावांत त्यांना गुंडाळले. त्यामुळे भारताने 124 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

रोहित शर्मा ( 91 धावा, 119 चेंडू) व शिखर धवन (68 धावा, 65 चेंडू) या सलामीवीरांनी केलेल्या भक्कम पायाभरणीवर कर्णधार विराट कोहली (नाबाद 81 धावा, 68 चेंडू) व युवराज सिंह (53 धावा - 32 चेंडू) यांनी कळस चढविल्यामुळे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेमध्ये पहिलाच सामना खेळत असलेल्या भारताने आज (रविवार) पाकिस्तानसमोर 48 षटकांत 320 धावांचे आव्हान ठेवण्यात यश मिळविले.

संयम व आक्रमकता यांचा सुरेख संगम साधत भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. युवराज बाद झाल्यानंतर फलंदाजीस आलेल्या हार्दिक पांड्या (नाबाद 20 धावा, 6 चेंडू) यानेही अखेरच्या षटकात सलग तीन टोलेजंग षटकार मारत या वाहत्या गंगेत हात धुवून घेतला. फिरकीपटू इमाद वसीम याने टाकलेल्या या अखेरच्या षटकांत तब्बल 23 धावा कुटण्यात आल्या!

मोहम्मद आमीर (8.1 षटके - 32 धावा) याचा काहीसा अपवाद वगळता पाकिस्तानच्या सर्वच गोलंदाजांची भारतीय फलंदाजीच्या अखेरच्या टप्प्यात अक्षरश: धुलाई झाली. वेगवान गोलंदाज वहाब रियाझ याला तर 8.4 षटकांत 87 धावा असे षटकामागे तब्बल 10 धावांच्या सरासरीने तडकाविण्यात आले.

तत्पूर्वी, सामन्यास सुरुवात होताना भारतीय सलामीवीरांनी सावध खेळ केला. यानंतर धावफलकास हळुहळू गती देत शर्मा व धवन यांनी भारतास 136 धावांची भक्कम सलामी दिली. धवन बाद झाल्यानंतर आलेल्या कोहली यानेही सुरुवातीस फार धोका न पत्करता एकेरी - दुहेरी धावांवरच भर दिला. शतकाच्या अगदी जवळ असताना शर्मा धावबाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या युवराजने मात्र स्थिरावण्यासाठी फारसा वेळ घेतला नाही. त्यामध्येच त्याचा एक झेल सोडण्यात आल्यानंतर युवराजने अधिक मोकळेपणाने फलंदाजीस सुरुवात केली! कोहली यानेही योग्य वेळी "टॉप गिअर' टाकत भारतास वेगाने 300 च्या समीप नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

यानंतर, पांड्या व कोहली यांनी अखेरच्या षटकात केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे भारतास 48 षटकांअखेर पाकिस्तानसमोर 320 धावांचे आव्हान ठेवण्यात यश आले.

सामन्यात दोनदा पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना 48 षटकांचा करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Champions Trophy: India 319/3 after 48 overs