Champions Trophy : भारतीय संघ पाकिस्तानात जाणार? अनुराग ठाकूरांनी दिले हे संकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India and Pakistan

भारतीय संघ पाकिस्तानात जाणार? अनुराग ठाकूरांनी दिले हे संकेत

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी (ता. १६) पुढील दहा वर्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहेत. या वेळापत्रकानुसार २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. १९९६ च्या विश्वचषक फायनलनंतर पाकिस्तानने कोणत्याही आयसीसी स्पर्धेचे आयोजन केलेले नाही. सद्या भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध चांगले नाही. यावर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मत मांडले आहे.

सुरक्षेच्या कारणावरून एका दशकाहून अधिक काळापासून पाकिस्तानमध्ये खेळले जाणारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे प्रमाण मर्यादित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडचा संघ सामन्यापूर्वीच दौरा सोडून मायदेशी परतला होता. यानंतर इंग्लंडनेही पाकिस्तानचा दौरा रद्द केला होता. काल आयसीसीने घोषित केलेल्या कार्यक्रमांमुळे भारत व पाकिस्तान यांच्यातील सामने पुन्हा चर्चेत आले आहेत.

हेही वाचा: मोनालिसाची किलर ब्यूटी; काळ्या ड्रेसमध्ये पाहून चाहते घायाळ

दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे भारत आणि पाकिस्तान आता फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांविरोधात खेळतात. कोणत्याही मालिकेसाठी भारताने पाकिस्तान दौरा करून बराच काळ लोटला आहे. आयसीसी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला दिल्याने अनुराग ठाकूर यांनी मत मांडले. वेळ आल्यावर काय करायचे ते पाहू. पाकिस्तानमध्ये खेळायला जायचे की नाही या निर्णयात गृह मंत्रालयाचा सहभाग असेल, असे ते म्हणाले.

दोन दशकांनंतर होणार मोठी स्पर्धा

२०२५ मध्‍ये आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद दिल्यावर दोन दशकांहून अधिक काळानंतर पाकमध्‍ये मोठी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. १९९६ च्या विश्वचषक फायनलनंतर पाकिस्तानने कोणत्याही आयसीसी स्पर्धेचे आयोजन केलेले नाही. २००८ मध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार होती. मात्र, ती दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात आली.

यूएईमध्ये होणार सामने?

२००९ मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकेच्या टीम बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्तानात मोठे सामने खेळले गेलेले नाही. शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये यूकेमध्ये आयोजिण्यात आली होती. आठ वर्षांनंतर ही स्पर्धा खेळली जाणार आहे. न्यूझीलंड व इंग्लंडने नुकतेच पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे कोणते देश पाकिस्तानात खेळतात हेच पाहणे बाकी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यूएईमध्ये हे सामने पाकिस्तानकडून खेळवले जाऊ शकतात.

loading image
go to top