उत्तेजक चाचणीत "तो' निघाला गरोदर

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

उत्तेजक चाचणीत तो गरोदर निघाला; त्यामुळे त्याच्यावर तातडीने दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय झाला. आपण उत्तेजक चाचणीत फसू नये यासाठी त्याने आपल्या मैत्रिणीचा मूत्रनमुना तपासणीसाठी दिला होता.

वॉशिंग्टन : उत्तेजक चाचणीत तो गरोदर निघाला; त्यामुळे त्याच्यावर तातडीने दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय झाला. आपण उत्तेजक चाचणीत फसू नये यासाठी त्याने आपल्या मैत्रिणीचा मूत्रनमुना तपासणीसाठी दिला होता.

अमेरिकेत व्यावसायिक बास्केटबॉल खेळणारा डी. जे. कूपर याची उत्तेजक चाचणी गतवर्षी झाली होती. त्या वेळी त्याने या चाचणीसाठी आपला मूत्रनमुना दिला. त्या नमुन्यात उत्तेजक आढळले नाही; पण त्यात तो गरोदर असल्याचे दर्शवणारे हार्मोन्स आढळले. अर्थातच बोस्निया राष्ट्रीय संघातून खेळण्याची त्याची योजना बारगळली. एवढेच नव्हे; तर फसवणूक केल्याबद्दल दोन वर्षांची बंदी घालण्यात आली, असे वृत्त यूरोहूप्सने दिले आहे.

कूपर गेली चार वर्षे अमेरिकेतील महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत खेळत आहे. एवढेच नव्हे; तर तो एएस मोनॅको या संघाकडून खेळला होता. आता त्याच्यावर 2020 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

कूपरची अर्थातच ट्‌विटरवरून हुर्यो उडवण्यात आली. त्याच्या छायाचित्रासोबत "गरोदर' ही टिपण्णी करण्यात आली. त्याचे वडील होत असल्याबद्दल अभिनंदनही काहींनी केले. अनेक खेळाडूंनी उत्तेजक चाचणीत दोषी ठरू नये यासाठी मूत्रनमुन्यात अनेक गोष्टी मिसळल्याचे लक्षात आले आहे; पण पुरुष खेळाडूच्या उत्तेजक चाचणीत प्रेग्नसी हार्मोन्स आढळल्याची ही पहिलीच वेळ असावी. आता कूपरला त्या वेळी आपली मैत्रीण गरोदर आहे, याची कल्पनाही नसणार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cheat player gave sample of his girlfriend