IPL 2019 : पराभवामुळे आधीच रोहीत वैतागलाय; त्यात आज समोर धोनी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

तीन सामन्यांत दोन पराभव त्यात आता गतविजेत्या आणि यंदाही फॉर्मात असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान, तसेच वेळ आणि षटकांची गती आणि वेळेचे गणित जुळवण्याचे आव्हान अशा चक्रव्युहातून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मार्ग काढायचा आहे.

आयपीएल 2019 : मुंबई : तीन सामन्यांत दोन पराभव त्यात आता गतविजेत्या आणि यंदाही फॉर्मात असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान, तसेच वेळ आणि षटकांची गती आणि वेळेचे गणित जुळवण्याचे आव्हान अशा चक्रव्युहातून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मार्ग काढायचा आहे.

वानखेडे स्टेडियमवर आज होणारी ही लढत मुंबईसाठी सोपी नसेल हे निश्‍चित आहे. गतमोसमातील सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला वानखेडे स्टेडियमवर पराभूत करून आपली विजेतेपदाची मोहिम सुरु केली होती. यंदा आत्तापर्यंतच्या तीन सामन्यात हेलखावे खाणाऱ्या मुंबईपेक्षा चेन्नईलाच अधिक पसंती असेल. सलग तीन विजय मिळवून चेन्नई पहिल्या क्रमांकावर असल्याने आत्मविश्‍वास त्यांच्या बाजूने आहे. 

इतिहास मात्र मुंबईच्या बाजूने आहे. वानखेडे स्टेडियमवर या दोन संघात झालेल्या गेल्या पाच सामन्यांपैकी तीन सामने मुंबईने जिंकलेले आहेत तर 14 :12 ही आकडेवारी मुंबईच्या बाजूने आहे, परंतु मुंबईसाठी इतिहासापेक्षा वर्तमान चिंता करणारे आहे. चेन्नईकडे मॅचविनरची संख्या अधिक आहे. त्यात विंटेज महेंद्रसिंग धोनी फॉर्मात आला आहे. राजस्थान रॉयल्सविरुदधच्या सामन्यात 46 चेंडूत 75 धावांची तडाखेबंद खेळी करून आपल्या बॅटची ताकद दाखवली आहे. 

बंगळुरविरुद्ध "नोबॉल' चेंडूवर विजयाचे दान पारड्यात पडलेल्या मुंबईची इतर दोन सामन्यातील कामगिरीही निराशाजनक होती. जसप्रिस बुमरा, लसिथ मलिंगा, हार्दिक-क्रुणाल पंड्या आणि मॅक्‍लेघन असे आंतरराष्ट्रीय अनुभव असलेला गोलंदाज असले तरी पहिल्या सामन्यात द्विशतकी धावा फटकावण्यात आल्या होत्या आणि पंजाबविरुद्ध भक्कम धावसंखेचे रक्षण करता आले नव्हते. या पार्श्‍वभूमीवर मुंबईला विजय मिळवायचा असेल तर प्रथम गोलंदाजीस सुधारणा होणे आवश्‍यक आहे. 

मुंबई संघात बदल अपेक्षित 
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मंबईला प्रामुख्याने फलंदाजीत बदल करावे लागणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विन्टॉन डिकॉक तसेच पहिल्या सामन्यातील युवराज सिंगचा अपवाद वगळता मुंबईच्या फलंदाजांनी निराशा केलेली आहे. किएरॉन पोलार्डचे अपयश तर उठून दिसणारे आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात बदल अपेक्षित आहेत. एविन लुईसला संधी दिली जाऊ शकेल. तसेच मलिंगाऐवजी अलझारी जोसेफ किंवा अष्टपैलू बेन कटिंग यापैकी एकाला संधी मिळू शकेल. 

सामना वेळेत संपणार? 
निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे रोहित शर्माला 12 लाखांचा दंड करण्यात आलेला आहे. मुळात मुंबई इंडियन्सचे सामने वेळेत पूर्ण होत नसतात रोहितला उद्याच्या सामन्यात अशी चुक आणखी महाग ठरू शकेल त्यामुळे मुंबईच्या सर्व खेळाडूंना "वेग' वाढवावा लागणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chennai Super Kings vs Mumbai Indians preview in IPL 2019