IPL 2019 : नाइट रायडर्सविरुद्ध चेन्नईच 'सुपर'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 षटकांत 8 बाद 161 धावा केल्या. चेन्नईने दोन चेंडू राखून विजय मिळविताना 5 बाद 162 धावा केल्या. सुरेश रैनाने संयमी अर्धशतक झळकाविले. पण अखेरच्या दोन षटकांत रवींद्र जडेजाने वसूल केलेले पाच चौकारच निर्णायक ठरले. 

कोलकाता : इम्रान ताहिरच्या फिरकीनंतर रवींद्र जडेजाच्या निर्णायक फटकेबाजीमुळे कोलकता नाइट रायडर्सविरुद्ध पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच सरस ठरले. चेन्नईने रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाताचा पाच गडी राखून पराभव केला. 

प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 षटकांत 8 बाद 161 धावा केल्या. चेन्नईने दोन चेंडू राखून विजय मिळविताना 5 बाद 162 धावा केल्या. सुरेश रैनाने संयमी अर्धशतक झळकाविले. पण अखेरच्या दोन षटकांत रवींद्र जडेजाने वसूल केलेले पाच चौकारच निर्णायक ठरले. 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता संघाला आज ख्रिस लीन याने तारले. समोरच्या बाजूने प्रमुख फलंदाज एकामागून बाद होत असताना लीनची फटकेबाजी निर्णायक ठरली. तो सोळाव्या षटकात बाद झाला. त्याने 51 चेंडू खेळताना 7 चौकार, 6 षट्‌करांची आतषबाजी करतना 82 धावांची खेळी केली. कोलकाताच्या फलंदाजीचा आतापर्यंतचा तारणहार आंद्रे रसेल आजही जोमात होता. त्याने 4 चेंडूंत 1 चौकार, 1 षट्‌कार अशी सुरवात करताना 10 धावा केल्या. पण या वेळी त्याची फटकेबाजी तेथेच थांबली. शार्दूल ठाकूर आणि इम्रान ताहिर यांच्या गोलंदाजीमुळे नाइट रायडर्सच्या फलंदाजांना मोकळीक मिळाली नाही. ताहिरने 27 धावांत 4 गडी बाद केले. 

आव्हानाचा पाठलाग करताना अडखळत चाललेल्या चेन्नईच्या डावाला सुरेश रैनाने स्थिरता आणली. प्रमुख फलंदाज स्थिरावल्यानंतर बाद होत असताना त्याने एकाबाजूने नेटाने फलंदाजी करत अर्धशतक झळकाविले. मात्र रवींद्र जडेजाची अखेरच्या दोन षटकांतील फटकेबाजी आणि त्याने तडाकवलेले पाच चौकार निर्णायक ठरले. दोन षटकांत 24 धावांची गरज असताना जडेजाने गुर्नेने टाकलेल्या 19व्या षटकात 16 धावा कुटल्या. नंतर चावलाच्या पहिल्या चार चेंडूंवर जडेजाने विजय साकार केला. 

संक्षिप्त धावफलक ः कोलकाता नाइट रायडर्स 20 षटकांत 8 बाद 161 (ख्रिस लाइन 82 -51 चेंडू, 7 चौकार, 6 षट्‌कार, नितीश राणा 21, इम्रान ताहिर 4-27, शार्दूल ठाकूर 2-18) पराभूत वि. चेन्नई सुपर किंग्ज 19.4 षटकात 5 बाद 162 (सुरेश रैना नाबाद 58 -42 चेंडू, 7 चौकार, 1 षट्‌कार, रवींद्र जडेजा नाबाद 31 -17 चेंडू, 5 चौकार, सुनील नारायण 2-19, पीयूष चावला 2-32) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chennai super kings won against Kolkata Knight Riders in IPL 2019