Sarfaraz Khan : धावांचा पाऊस पाडणाऱ्या दोन मुंबईकरांकडे दुर्लक्ष; काय म्हणाले चेतन शर्मा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prithvi Shaw Sarfaraz khan Chetan Sharma Statement

Sarfaraz Khan : धावांचा पाऊस पाडणाऱ्या दोन मुंबईकरांकडे दुर्लक्ष; काय म्हणाले चेतन शर्मा?

Prithvi Shaw Sarfaraz khan Chetan Sharma Statement : भारतीय पुरूष वरिष्ठ संघ निवडसमितीने न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा केली. न्यूझीलंडमधील वनडे आणि टी 20 मालिकेसाठी दोन तर बांगलादेश दौऱ्यावरील वनडे आणि कसोटी सामन्यासाठी दोन अशा चार संघांची घोषणा चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीने एका दमात करून टाकली. मात्र या चारपैकी एकाही संघात मुबंईकडून धावांचा पाऊस पाडणाऱ्या पृथ्वी शॉ आणि सर्फराझ खान यांची निवड न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा: Dinesh Karthik : टी-20 वर्ल्डकपनंतर दिनेश कार्तिकचा 'गेम ओव्हर'?

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत पृथ्वी शॉ आणि सर्फराझ खान यांनी खोऱ्याने धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉने मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत आपल्या आक्रमक खेळीने सर्वांना प्रभावित केले. तर सर्फराझ खानने रणजी ट्रॉफी स्पर्धेत शतक आणि द्विशतकांचा रतीब घातला होता. सर्फराज खानने 2021 - 22 च्या रणजी ट्रॉफी हंगामात एकूण 982 धावा केल्या. तो हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. तसेच सलग दोन रणजी हंगामात 900 पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. सर्फराजने रणजी ट्रॉफी, दिलीप ट्रॉफी आणि इराणी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतकी खेळी केली होतीप्रथम श्रेणी क्रिकेटमधील . गेल्या 24 डावात त्याने एकूण 9 शतके आणि 5 अर्धशतके ठोकली आहेत. तरी देखील निवडसमितीने बांगलादेशविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याचा विचार केला नाही.

याबाबत निवडसिमीत अध्यक्ष चेतन शर्मा म्हणाले की, 'सर्फराझ खानवर आमचं लक्ष आहे. जेथे शक्य आहे तेथे त्याला संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आम्ही त्याला नुकतेच भारतीय अ संघात स्थान दिले होते. तो एक जबरदस्त खेळाडू आहे. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे. मात्र भारतीय संघात त्याला सामावून घेण्यासाठी संघात जागा निर्माण झाली पाहिजे. तो हुशार खेळाडू आहे त्याला देखील ही गोष्ट माहिती आहे. निवडसमिती देखील त्याच्या सातत्याने संपर्कात आहे. तो भारतीय संघनिवडीपासून फार दूर नाहीये. मी देखील त्याच्याशी कायम चर्चा करत असतो. त्याला लवकरच संधी मिळेल.'

हेही वाचा: AFG vs SL : लंकेने इंग्लंडचे टेन्शन वाढवले! अफगाणिस्तानचा केला 6 विकेट्सनी पराभव

दुसरीकडे संघ निवडीनंतर आपल्या इन्स्टा स्टोरीने चर्चेत आलेल्या पृथ्वी शॉबद्दल देखील निवडसमिती अध्यक्ष चेतन शर्मा म्हणाले, 'आम्ही त्याच्याही सातत्याने संपर्कात आहोत. त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याच्यात कोणताही दोष नाहीये. आम्हाला सध्याच्या सेट अपकडे पहावे लागले. जे संघात आहेत आणि कामगिरी करत आहेत त्यांना पुरेशी संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पृथ्वीला देखील त्याची संधी लवकरच मिळेल. आम्ही ज्या ज्या वेळी सामने पहावयास जातो त्या त्या वेळी त्याच्याशी चर्चा करतो.'