चीनची टेनिसपटू पेंग शुई बेपत्ता | tennis player | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चीनची टेनिसपटू पेंग शुई बेपत्ता

चीनची टेनिसपटू पेंग शुई बेपत्ता

बीजिंग : चीनची टेनिस स्टार पेंग शुई अनेक दिवसांपासून गायब आहे. तिचा अद्यापही ठावठिकाणा लागला नसल्याने टेनिस क्षेत्रात आक्रोश वाढला आहे. त्यामुळेच महिला टेनिस असोसिएशनने (डब्लूटीए) चीनमधून आगामी टेनिस स्पर्धा काढून घेण्याची धमकी दिली आहे. तर दुसरीकडे व्हाइट हाउसनेही बीजिंग प्रशासनाला ती सुरक्षित असल्याचे सिद्ध करण्यास सांगितले आहे.

दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत यापूर्वी अव्वल स्थानी असलेली पेंग २ नोव्हेंबर रोजी तिने चिनी सोशल मीडियावर ‘माजी उप-प्रधानमंत्री झांग गाओलींनी तिला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.’ असा खुलासा केल्यापासून ती बेपत्ता आहे.

हेही वाचा: भारताविरुद्ध पराभव; न्यूझीलंडचा माजी खेळाडू म्हणतो, 'अर्थहीन मालिका'

चीन सरकारने अद्यापही तिच्या आरोपावर भाष्य केलेले नसले तरी पेंगची सोशल मीडिया पोस्टही त्वरित हटविली गेली आणि लोकांच्या यासंबंधी प्रतिक्रियांवरही बंधने घालण्यात आली आहेत. डब्लूटीएने चौकशीची मागणी केल्यानंतर पेंगच्या सुरक्षेबद्दल जागतिक टेनिस समुदायामध्ये चिंता वाढली आहे. सेरेना विल्यम्स, नोवाक जोकोविच आणि नाओमी ओसाकासह जर्मन ऑलिंपिक समितीनेही ‘‘पेंग शुई कुठे आहे?’’ असा हॅशटॅग सोशल मीडियावर वापरत चळवळ उभी केली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असणाऱ्या व्हाइट हाऊसने देखील चीन सरकारशी संपर्क साधत पेंगच्या सुरक्षिततेबद्दल ‘सबळ पुरावे’ प्रदान करण्याचे आवाहन केले आहे.

‘‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यापासून पेंग शुई बेपत्ता असल्याच्या वृत्तामुळे आम्ही चिंतित आहोत.’’ असे व्हाइट हाऊस प्रवक्त्या जेन साकी यांनी सांगितले आहे. फ्रान्सचे क्रीडा मंत्री रोक्साना मॅरासिनी यांनीही याप्रकरणी पारदर्शकतेचे आवाहन केले आहे.

चीनवरील दबाव वाढला

चीनने गेल्या दशकांत महिला टेनिस असोसिएशनच्या विस्तारावर लक्ष केंद्रित केलेले आहे. २०१९ च्या हंगामात त्यांनी एकूण ३०.४ दशलक्ष डॉलर्सच्या बक्षीस रकमेसह नऊ स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यामुळे डब्लूटीएने स्पर्धा काढून घेण्याची धमकी दिल्याने त्यांच्यावरील दबाव वाढला आहे.

loading image
go to top