ऍकरमनची अफलातून बात, 18 धावांत विकेट सात

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

दक्षिण आफ्रिकेचा ऑफब्रेक गोलंदाज कॉलीन ऍकरमन याने टी20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा विश्वविक्रम नोंदविला. त्याने 18 धावांत 7 विकेट घेतल्या. इंग्लंडमधील स्थानिक टी20 क्रिकेट स्पर्धेत (व्हायटॅलिटी ब्लास्ट) त्याने ही कामगिरी केली. तो लिस्टरशायरकडून खेळतो.

दक्षिण आफ्रिकेचा ऑफब्रेक गोलंदाज कॉलीन ऍकरमन याने टी20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा विश्वविक्रम नोंदविला. त्याने 18 धावांत 7 विकेट घेतल्या. इंग्लंडमधील स्थानिक टी20 क्रिकेट स्पर्धेत (व्हायटॅलिटी ब्लास्ट) त्याने ही कामगिरी केली. तो लिस्टरशायरकडून खेळतो. लिस्टरमधील ग्रेस रोड मैदानावर बर्मिंगहॅम बेअर्स संघाविरुद्ध त्याने ही कामगिरी केली.

ऍकरमन 28 वर्षांचा आहे. याआधीचा उच्चांक मलेशियाच्या अरुल सुप्पीया याच्या नावावर होता. ग्लॉमॉर्गनकडून खेळताना अरुलने 2011 मध्ये सॉमरसेटविरुद्ध 5 धावांत 6 विकेट अशी कामगिरी केली होती. 5 जुलै 2011 रोजी त्याने 3.4-0-5-6 अशी कामगिरी नोंदविली होती.

ऍकरमन हा कर्णधार सुद्धा आहे. त्याच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 189 धावसंख्या उभारली होती. ऍकरमनच्या भेदकतेसमोर बर्मिंगहॅमचा डाव 134 धावांत संपला.

वाटले नव्हते रेकॉर्ड करेन

55 धावांनी विजय मिळविल्यानंतर ऍकरमन म्हणाला की, या कामगिरीमुळे अजूनही आश्चर्य वाटते आहे. हा सामना दिर्घ काळ माझ्या स्मरणात राहील याची खात्री आहे. ग्रेस रोड मैदानार चेंडू वळण्याची ही पहिलीच वेळ असावी असे वाटते. मी उंचीचा फायदा उठवित चेंडू थोडा उसळविण्याचा प्रयत्न केला. मैदानाच्या मोठ्या भागात फटके मारण्यास फलंदाजांना भाग पाडण्याचा माझा प्रयत्न होता. मी वेगात वैविध्य राखले. खरे तर मी बॅटींग ऑल-राऊंडर आहे. त्यामुळे कधी काळी गोलंदाज म्हणून विश्वविक्रम करून असे मला कदापी वाटले नव्हते.

ऍकरमनची यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी 21 धावांत 3 विकेट अशी होती. यावेळी ऍकरमनने तिसऱ्याच षटकात चेंडू हातात घेतला. त्याने मायकेल बर्गेसला बाद करून पहिली विकेट घेतली. तिसरा चेंडू सीमापार केल्यानंतर बर्गेस पुढील चेंडूवर बाद झाला. या षटकात 8 धावा गेल्या. डावाच्या सातव्या व वैयक्तिक दुसऱ्या षटकात त्याने पाच धावा दिल्या, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही.

शेवटी एक तरी बेल पडली
मग 15व्या षटकासाठी ऍकरमन गोलंदाजीस आला. पहिल्याच चेंडूवर विल ऱ्होड््स नाट्यमयरित्या बाद झाला. चेंडू स्टम्पला लागल्यानंतर काही सेकंदांनी एकच बेल पडली, तोपर्यंत चेंडू यष्टिरक्षक लुईस हिल याच्या हातात गेला होता. हिलने यष्टिचीतचा प्रयत्नही केला. थर्ड अम्पायरचा कौल घेतल्यानंतरच त्रिफळाबाद असल्याचे नक्की झाले. त्यानंतर ऍकरमनने तिसऱ्या चेंडूवर लियाम बँक्स, तर पाचव्या चेंडूवर अॅलेक्स थॉमसन यांना बाद केले. वैयक्तिक चौथ्या व डावातील 17व्या षटकात त्याने सॅम हैनला पहिल्या, हेन्री ब्रुक्सला चौथ्या, तर जीतन पटेलला सहाव्या चेंडूवर टिपले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Colin Ackermann Registers Best Bowling Figures In T20s