esakal | सिंगापूरला शह देत महिला टेबल टेनिसचे सुवर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

गोल्ड कोस्ट - भारतीय महिला टेनिसपटू ऐतिहासिक सुवर्णपदकाचा जल्लोष करताना.

सिंगापूरला शह देत महिला टेबल टेनिसचे सुवर्ण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल क्रीडा टेबल टेनिस स्पर्धेत इतिहास घडवला. मनिका बत्रा आणि तिच्या सहकाऱ्यांनी सिंगापूरची या स्पर्धेतील मक्तेदारी मोडीत काढत सुवर्णपदक जिंकले.

भारतीय महिला टेबल टेनिसमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. नवी दिल्लीतील २०१० च्या स्पर्धेत भारताने रौप्यपदक जिंकले होते. त्या वेळी अंतिम लढतीत सिंगापूरविरुद्ध हार पत्करावी लागली होती; मात्र या वेळी मनिका बत्रा, मौमा दास, मधुरिका पाटकर, पूजा सहस्रबुद्धे आणि सुतीर्था मुखर्जीचा समावेश असलेल्या संघाने त्यापेक्षा सरस कामगिरी केली. भारताच्या यशामुळे सिंगापूरने प्रथमच या स्पर्धेतील सुवर्णपदक गमावले. राष्ट्रकुलातील महिला टेबल टेनिसच्या सांघिक स्पर्धेस २००२ पासून सुरवात झाली. 

भारताच्या ऐतिहासिक विजयात मनिकाने मोलाची कामगिरी बजावली. तिने जागतिक क्रमवारीत चौथी असलेल्या तिएनवेई वॅंग हिला ४-१ असे हरवताना मोक्‍याच्यावेळी खेळ उंचावला. मनिकाने जोरदार सुरवात करून दिली; पण मधुरीका पाटकर मेंगयू यू हिच्याविरुद्ध ०-४ पराजित झाली. 

मोमा दास आणि मधुरीकाने दुहेरीत यू आणि यिहान झोऊ यांचा ३-१ असा पाडाव करीत भारतास आघाडीवर नेले. मनिकाने झोऊला तीन गेममध्येच हरवत भारतास अविस्मरणीय सुवर्णपदक मिळवून दिले. भारताने त्यापूर्वी उपांत्य फेरीत इंग्लंडला ३-० असे हरवले.

ऑलिंपिक पदक विजेत्या तसेच जागतिक क्रमवारीत चौथ्या असलेल्या खेळाडूस मी हरवू शकेन, असे मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते. फेंगला हरवल्यावर आपण जग जिंकले, असेच मला वाटले. भारताच्या सुवर्णपदकाने या विजयाची गोडी जास्तच वाढली आहे. 
- मनिका बत्रा