राष्ट्रकुल नेमबाजीस महासंघाचा विरोध?

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवरील भारताचा संभाव्य बहिष्कार टाळण्यासाठी ब्रिटनच्या क्रीडा मंत्र्यांनी स्पर्धेसोबत राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धा घेण्याची सूचना केली होती, पण त्यास राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने विरोध केला आहे.

मुंबई / लंडन : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवरील भारताचा संभाव्य बहिष्कार टाळण्यासाठी ब्रिटनच्या क्रीडा मंत्र्यांनी स्पर्धेसोबत राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धा घेण्याची सूचना केली होती, पण त्यास राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने विरोध केला आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी नसल्यामुळे भारत बहिष्कार टाकण्याचा विचार करीत आहे. त्यासाठी या स्पर्धेच्या सुमारास राष्ट्रकुल नेमबाजी घेण्याची सूचना ब्रिटनचे क्रीडा मंत्री निगेल ऍडम्स यांनी केली होती.

"राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणाऱ्या देशात स्पर्धेदरम्यान किंवा स्पर्धेपूर्वी तसेच स्पर्धेनंतर तीन महिने कोणतीही राष्ट्रकुल स्पर्धा होऊ शकत नाही. ही स्पर्धा घेण्याचे ठरवल्यास त्यास राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या कार्यकारिणीची मंजुरी आवश्‍यक असेल,' असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे मुख्य कार्यकारी आधिकारी डेव्हिड ग्रेवेनमबर्ग यांनी सांगितले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घेणारा देश स्पर्धेपूर्वी काही महिने राष्ट्रकुल क्रीडा चाचणी स्पर्धा घेऊ शकतो, पण त्या खेळाचा समावेश स्पर्धेत असणे आवश्‍यक असते, असेही सांगितले जात आहे.

भारत राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी न झाल्यास त्याचा ब्रिटनला मोठा आर्थिक फटका बसेल असे मानले जात आहे. त्याचा दोन देशातील आर्थिक व्यापारावरही परिणाम होऊ शकेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ब्रिटनने या स्पर्धेसाठी 78 कोटी 80 लाख पौंडचे अंदाजपत्रक तयार केले आहे.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: commonwealth games federation oppose commonwealth shooting championship