फलंदाजीच्या प्रशिक्षकपदासाठी अमरे-राठोड यांच्यात चुरस 

वृत्तसंस्था
रविवार, 4 ऑगस्ट 2019

 टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांना पुन्हा सर्वाधिक संधी असल्याचे जवळपास निश्‍चित समजले जात असताना फलंदाजीच्या प्रशिक्षकपदासाठी प्रवीण अमरे आणि विक्रम राठोड यांच्यात चुरस असणार आहे. 

नवी दिल्ली - टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांना पुन्हा सर्वाधिक संधी असल्याचे जवळपास निश्‍चित समजले जात असताना फलंदाजीच्या प्रशिक्षकपदासाठी प्रवीण अमरे आणि विक्रम राठोड यांच्यात चुरस असणार आहे. 

अमरे हे आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल संघाच्या फलंदाजीचे प्रशिक्षक आहेत, तसेच अजिंक्‍य रहाणेचे वैयक्तिक प्रशिक्षकही आहेत. भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी ते योग्य असल्याची चर्चा केली जात असली तरी राठोड यांचे आव्हान असेल. 

राठोड यांनीही या पदासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे या पदासाठी कोणाला पसंती मिळते याची सर्वांनाच उत्सुकता असेल, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतील अपयश त्यापेक्षा चौथ्या क्रमांकाचा प्रश्‍न व्यवस्थितपणे न हाताळल्यामुळे फलंदाजीचे विद्यमान प्रशिक्षक संजय बांगर यांची फेरनिवड होण्याची शक्‍यता नसल्याचे बोलले जात आहे. पण विद्यमान प्रशिक्षक असल्यामुळे बांगर पुन्हा निवड प्रक्रियेत थेट सहभागी होऊ शकतात, तरीही त्यांना पुन्हा संधी मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. 

टीम इंडियात फलंदाजीचे प्रशिक्षक असतानाही काही फलंदाज अपयश येत असेल तर माजी खेळाडूंचा सल्ला घेत असतात, याबाबतही संघ व्यवस्थापनात नाराजी आहे. संघातील या खेळाडूंची आमच्याकडे माहिती आहे, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगताना त्या फलंदाजांची नावे मात्र उघड करण्यास नकार दिला. विक्रम राठोड हे भारतीय संघाचे सलामीवीर होते. त्यांनी भारत "अ' आणि 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद सांभाळलेले आहे. 

खेळाडूंची पसंती अमरेंना 
अमरे यांना संघातील काही खेळाडूंची पसंती मिळण्याची शक्‍यता आहे. त्यात कसोटी उपकर्णधार रहाणेचे निश्‍चित झुकते माप असेल. अमरे यांनी केवळ रहाणेच नव्हे तर सुरेश रैना आणि रॉबीन उथप्पा यांनाही वैयक्तिक मार्गदर्शन केलेले आहे. उसळत्या चेंडूंचा सामना करण्यासाठी अमरे यांचा सल्ला आपल्याला मोलाचा ठरला असल्याचे रैना उघडपणे म्हणाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Competition between Praveen Amre and Vikram Rathore for the batting coach