स्पॉट फिक्‍सिंगची कबुली दिल्यासच खेळू देणार

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑगस्ट 2019

पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये स्पॉट फिक्‍सिंग केल्याची कबुली दिलीस, त्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक पुनर्वसन कार्यक्रम पूर्ण केलास, तरच खेळण्याची संधी मिळेल, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने शारजील खान याला बजावले आहे.
 

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये स्पॉट फिक्‍सिंग केल्याची कबुली दिलीस, त्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक पुनर्वसन कार्यक्रम पूर्ण केलास, तरच खेळण्याची संधी मिळेल, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने शारजील खान याला बजावले आहे.

पाकिस्तान लीगमध्ये स्पॉट फिक्‍सिंग केल्याबद्दल शारजीलवर पाच वर्षांची बंदी ऑगस्ट 2017 मध्ये घालण्यात आली होती. आता यातील निम्मी बंदी रद्द होऊ शकेल, असेही बंदीचा निर्णय घालताना पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक लवादाने सांगितले होते. इस्लामाबाद युनायटेडकडून खेळलेल्या शारजीलसह खलीद लतीफ, मोहम्मद इरफान, मोहम्मद नवाझ, नासीर जमशेद आणि शाहझैब हसन दोषी ठरले होते.

शारजील सप्टेंबरमध्ये होणाऱ्या कैद ए आझम करंडक स्पर्धेत खेळू शकेल; पण त्याने चूक मान्य करावी; तसेच त्याबद्दल माफीही मागावी, असे पाक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सलमान बट्ट आणि महम्मद आसीफ यांच्यावर स्पॉट फिक्‍सिंगमधील बंदी या प्रकारेच रद्द झाली होती, याची आठवण त्यांनी करून दिली.

शारजील पुनर्वसन प्रक्रियेस जाण्यास तयार आहे, असे यापूर्वीच पाक मंडळास कळवण्यात आले आहे. पुनर्वसन प्रक्रियेतील सहभाग म्हणजेच चूक मान्य करून माफी मागणे आहे, असा दावा शारजीलचे वकील शैघान एजाझ यांनी केला आहे. शारजीलने त्याच्यावरील पाच आरोप स्वीकारले आहेत; पण आपला स्पॉट फिक्‍सिंगमध्ये सहभाग होता; तसेच त्याद्वारे आपला आर्थिक फायदा झाला, हे मान्य करण्यास शारजील तयार नाही, असे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: conditional clearece for spot fixer cricket player