मोक्‍याच्या वेळी संयम राखल्याने यशस्वी ः चिराग

चिराग शेट्टी सात्विकसाईराज
चिराग शेट्टी सात्विकसाईराज

मुंबई : अंतिम फेरी खेळणे आणि ती जिंकणे. त्यात जागतिक विजेत्यांना पराजित करणे. मला तर शब्दच सुचत नाहीत, असे चिराग शेट्टीने सांगितले; मात्र त्याच वेळी त्याने मोक्‍याच्या वेळी एकमेकांना प्रोत्साहित करण्याचा तसेच शांत राहण्याचा फायदा झाला, असेही आवर्जून सांगितले.

हा आमच्या कारकिर्दीतील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. आम्हाला काय बोलावे, तेच कळत नाही. अंतिम फेरीत खेळलो. त्यात जागतिक विजेत्यांना हरवले. मला तर शब्दच सुचत नाहीत, मी खूप खूप खूष आहे. आम्ही खूप आनंदित आहोत, असे चिरागने सांगितले.

चिराग - सात्त्विकने भारतीय बॅडमिंटनमध्ये इतिहास घडवला होता. त्यांना शब्दच सूचत नव्हते. मात्र स्वतःला सावरत चिरागने आपल्या भावना शब्दात मांडण्यास सुरुवात केली. यापूर्वी आम्ही विजय जवळ आल्यावर सामना झटपट संपवण्यासाठी प्रयत्न करीत होतो. त्यामुळे चुका होत असत; मात्र त्यातून आता शिकलो आहोत. घाईघाईने खेळून गुण बहाल करण्यापेक्षा संयमास जास्त पसंती दिली. त्याचबरोबर त्यांना आक्रमणापासून रोखण्यासाठी शटल जास्तीत जास्त नेटजवळ ठेवण्याची चालही यशस्वी ठरली, असे चिरागने सांगितले.

या स्पर्धेचा ड्रॉ अवघड होता किंवा त्यात अन्य भारतीय नव्हते. या दडपणाचा सात्त्विक - चिरागने चांगल्या प्रकारे सामना केला, असे मानले जात आहे; पण चिरागला हे मान्य नाही. आम्ही याचा विचारही करीत नव्हतो. आम्ही पूर्णपणे सामन्यावर खेळावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे कदाचित फारसे दडपणही आले नसेल, असेही तो म्हणाला.

नक्कीच आशा होती
ऑस्ट्रेलियन स्पर्धेत याच जोडीस आम्ही झुंजवले होते; या वेळी ते दडपणाखाली आहेत, आपण नाही; हे आम्ही जाणून होतो. माझा काहीसा खांदा दुखत असल्याने मी नेटजवळ खेळणार आणि चिराग बेसलाईनवर, हेही आम्ही ठरवले. आम्ही कधीही आशा सोडली नव्हती. आम्ही संयम ठेवला. शटल कोर्टवर ठेवायचे, चुका करायच्या नाहीत, हेच ठरवले होते, असे सात्त्विकने सांगितले. आमच्या कारकिर्दीतील हे सर्वात मोठे यश आहे. ते साध्य केले, यावर अजूनही पूर्ण विश्वास बसत नाही, असेही तो म्हणाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com