'रोनाल्डोचा पुतळा बसवणे हा तर गोव्याचा अपमान'

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गोव्यात बसवलेल्या पुतळ्यावरुन वाद
Cristiano Ronaldo Statue
Cristiano Ronaldo Statueesakal

पणजी : गोव्यातील कलंगुट येथील पार्कमध्ये बसवण्यात आलेल्या पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पुतळ्याचे (Cristiano Ronaldo Statue) अनावरण करण्यात आले. या पुतळ्याचे अनावरण मंगळवारी करण्यात आले. मात्र आता या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आहे.

कलंगुट (Calangute) या गोव्यातील (Goa) समुद्रकिनाऱ्यावरील गावात युवकांना प्रेरणा मिळावी यासाठी ख्रिस्तियानो रोनाल्डोचा ४१५ किलो वजनाचा पुतळा बसवण्यात आला. गुरुवारी त्याचे अनावरणही झाले. मात्र त्यानंतर या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला असून पुतळा बसवलेल्या ठिकाणी आंदोलन सुरु झाले आहे. आंदोलकांनी राज्य सरकारवर दिग्गज स्थानिक फुटबॉलपटूंकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. भारतीय फुटबॉल (Indian Football) संघाचे माजी कर्णधार अर्जून पुरस्कार विजेते ब्रुनो कोटिन्हो हे मुळचे कलंगुटचेच आहेत. मात्र त्यांचा सन्मान करण्याऐवजी पोर्तुगालच्या रोनाल्डोचा पुतळा बसवण्यात आला असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, भाजपचे स्थानिक आमदार आणि मंत्री मायकेल लोबो (Michael Lobo) यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षापासून रोनाल्डोचा ४१५ किलोचा पितळेचा पुतळा बसवण्याची योजना आखली होती. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) हा भारतातील पहिला पुतळा आहे. याचा उद्येश फक्त युवकांना प्रेरणा मिळवी हाच आहे. तुम्हाला जर देशातील फुटबॉल एका वेगळ्याच उंचीवर न्यायचे आहे. मग त्यासाठी मुला मुलींना यासारख्या प्रेरणेची गरज आहे.'

लोबो पुढे म्हणाले की, 'आपल्या मुला मुलींनी चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांना चांगल्या सोयी सुविधा देणे गरजेचे आहे. हा पुतळा हा फक्त प्रेरणेसाठी आहे. सरकारने चांगले मैदान, सोयी सुविधा आणि चांगले प्रशिक्षक देण्याची गरज आहे.'

मंत्री लोबोंनी सांगितले की, भारताची एवढी मोठी लोकसंख्या असून देखील देशाचा फुटबॉल संघ छोट्या छोट्या देशांना हरवू शकत नाही. त्यामुळे गोव्यातील प्रत्येक गावात चांगल्या प्रशिक्षणाच्या सुविधा दिल्या पाहिजेत. जे लोक ख्रिस्तियानो रोनाल्डो पार्कवर येतील ते त्याच्यासारखे होण्याची प्रेरणा घेतील. ते पुढे गोवा आणि देशाकडून खेळतील. आम्हाला कलंगुट, कँडोलिम आणि इतर समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांना प्रेरणा द्यायची आहे.

मात्र यावर आक्षेप घेत कलंगुटमधील प्रसिद्ध नाईट क्लब टिटोजचे मालक रिकार्डो डिसुझा यांनी सांगितले की, रोनाल्डोच्या ऐवजी गोवाच्या मातीतील ब्रुनो कोटिन्हो आणि समीर नाईक यासारख्या फुटबॉलपटूंचा पुतळा बसवला पाहिजे.

ते म्हणाले की, 'रोनाल्डोचा पुतळा बसवल्याचे ऐकून निराशा झाली. आपल्याला ब्रुनो कोटिन्हो आणि समीर नाईक यासारख्या आपल्या आदर्शांकडून प्रेरणा घेणे शिकले पाहिजे.' दरम्यान, काही उजव्या विचारसरणीच्या आंदोलकांनी पोर्तुगालच्या रोनाल्डोचा पुतळा लावणे हा गोव्याचा अपमान आहे. विशेषकरुन पोर्तुगालच्या (Portugal) ४५१ वर्षाच्या शासनानंतर स्वतंत्र झालेल्या गोव्याला ६० वर्षे पूर्ण होत असताना असे होत आहे.

आंदोलनकर्ते गुरु शिरोडकर यांनी सांगितले की, 'पोर्तुगीज (Portuguese) फुटबॉलपटूचा पुतळा बसवणे निंदनीय आहे. जर लोबोंना पुतळा बसवायचाच होता तर ब्रुनो कुटिन्हो यांचा बसवायला हवा होता.'

या आरोपांवर लोबो यांनी 'काही लोक रोनाल्डोच्या पुतळ्याचा विरोध करत आहेत. मला असे वाटते की ते फुटबॉलचा द्वेष करतात. फुटबॉल (Football) हा सर्वांचा आहे. फुटबॉल धर्म आणि जात याच्यात भेद करत नाही. तरीही ते काळे झेंडे दाखवत आहेत. त्यांच्या मनातच काळंबेरं आहे. ज्यांच्या मनात काळंबेरं असतं त्यांच्याशी कोण वाद घालू शकणार नाही.' असे प्रत्युत्तर दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com