टीम इंडियाचे 'द्रोणाचार्य' यांना पद्मश्री, गुरूचरण सिंग यांनी भारताला दिले १२ क्रिकेटर: Cricket coach Gurcharan Singh awarded Padma Shri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket coach Gurcharan Singh awarded Padma Shri

Padma Shri : टीम इंडियाचे 'द्रोणाचार्य' यांना पद्मश्री, गुरूचरण सिंग यांनी भारताला दिले १२ क्रिकेटर

७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सर कारकडून पद्म नागरी पुरस्कारांची करण्यात आली आहे. यामध्ये पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांचा समावेश आहे. यांपैकी ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण तर ९१ पद्मश्री जाहीर झाले आहेत. विशेष म्हणजे, माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आणि भारताचे माजी प्रशिक्षक गुरचरण सिंग यांचेही नाव पद्मश्री पुरस्कार विजेत्यांच्या यादीत आहे.(Cricket coach Gurcharan Singh awarded Padma Shri )

गुरचरण सिंह यांचा जन्म 13 जून 1935 रोजी रावळपिंडी येथे झाला. 1947 मध्ये भारताची फाळणी झाली तेव्हा गुरचरण सिंग निर्वासित म्हणून पटियाला येथे आले. पटियालाचे महाराजा यादवेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी क्रिकेटचा प्रवास सुरू केला. एक क्रिकेटपटू म्हणून, त्याने पटियाला, दक्षिण पंजाब आणि रेल्वे संघांचे प्रतिनिधित्व केले आणि एकूण 37 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.

या 37 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये गुरचरण सिंग यांनी 19.96 च्या सरासरीने 1198 धावा केल्या, त्यात एका शतकाचा समावेश आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर गुरचरण यांनी 33.50 च्या सरासरीने 44 विकेट घेतल्या. 87 वर्षीय गुरचरण सिंग यांची क्रिकेट कारकीर्द देशांतर्गत क्रिकेटपलीकडे प्रगती करू शकले नाहीत. पण प्रशिक्षक म्हणून त्यांनी अशा खेळाडूंचे पालनपोषण केले जे नंतर भारताचे प्रतिनिधित्व करू शकले.

गुरचरण सिंग यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, पटियाला येथून कोचिंग डिप्लोमा प्राप्त केला आणि नंतर भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून सामील झाले. 1977 ते 1983 दरम्यान, उत्तर विभागाचे प्रशिक्षक म्हणून त्यांचा कार्यकाळ नेत्रदीपक होता. 1985 मध्ये त्यांनी मालदीव संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.

यानंतर गुरचरण सिंग यांनी 1986-87 दरम्यान टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. विशेष म्हणजे गुरचरण सिंग यांनी शंभराहून अधिक क्रिकेटपटूंना प्रशिक्षण दिले. त्यापैकी १२ जणांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव कमावले. या यादीत कीर्ती आझाद, मनिंदर सिंग, विवेक राजदान, गुरशरण सिंग, अजय जडेजा, राहुल संघवी आणि मुरली कार्तिक यांसारख्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

1987 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला

गुरचरण सिंग यांना 1987 मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी, द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारे देशप्रम आझाद यांच्यानंतरचे ते दुसरे क्रिकेट प्रशिक्षक होते. गुरचरण सिंग १९९२-९३ दरम्यान ग्वाल्हेरच्या पेस बॉलिंग अकादमीमध्ये संचालक म्हणून सामील झाले. ही अकादमी लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन आणि बीसीसीआय यांनी संयुक्तपणे सुरू केली आहे.