
जडेजाच्या शतकाने भारत सुस्थितीत
बर्मिंगहॅम : रवींद्र जडेजाचे अफलातून शतक (१०४ धावा) आणि त्याने महंमद शमीसोबत केलेली भागीदारी भारताला ४१६ धावसंख्येवर घेऊन गेली. जिमी अँडरसनने पाच बळी मिळवले, परंतु कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळावर भारतीयांनी वर्चस्व राखले. फलंदाजीत कमाल करणाऱ्या कर्णधार जसप्रीत बुमराने गोलंदाजीतही भेदकता दाखवली इंग्लंडचे तीन फलंदाज बाद केले असताना पावसाने खेळ रोखला गेला. पावसाचा दुसरा व्यत्यय येईपर्यंत भारताने इंग्लंडची ३ बाद ६० अशी अवस्था केली होती.
एजबास्टन मैदानावर ७ बाद ३३८ धावसंख्येवरून दुसऱ्या दिवशी खेळ चालू झाला तेव्हा रवींद्र जडेजावर सगळ्यांचे लक्ष होते. जडेजा किती काळ मैदानावर टिकतो यावर भारतीय धावसंख्या अजून किती फुगते हे अवलंबून होते. दुसरा नवा चेंडू घ्यायला सात षटके बाकी असल्याने बेन स्टोक्सने जिमी अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडला राखून ठेवले. जडेजा-शमीने त्याचा फायदा घेत ३५ धावा वेगाने जोडल्या. इंग्लिश गोलंदाजांनी आखूड टप्प्याचा मारा करून मोठी चूक केली. जडेजाने बहारदार फलंदाजी करून शतक झोकात पूर्ण केले आणि नंतर बॅट तलवारीसारखी फिरवून नेहमीच्या शैलीत मानवंदना स्वीकारली. किती वेळा जडेजाने संघाची गरज असताना मोक्याची खेळी केली, याची चर्चा कॉमेंटेटर्स करत होते. १०४ धावा करून जडेजा बाद झाला, तेव्हा भारताचा डाव लगेच आटोपेल असे वाटले होते. झाले भलतेच, स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात ३५ धावा निघाल्याने भारताची धावसंख्या ४०० च्या पुढे गेली.
संक्षिप्त धावफलक ः भारत, पहिला डाव ः ८४.५ षटकांत सर्वबाद ४१६ (रिषभ पंत १४६, रवींद्र जडेजा १०४ -१९४ चेंडू, १३ चौकार, जसप्रित बुमरा नाबाद ३१ -१६ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, अवांतर ४०; जेम्स अँडरसन २१.५-४-६०-५, मॅथ्यू पॉटस २०-१-१०५-२, स्टूअर्ट ब्रॉड १८-३-८९-१)
बुमराचा भेदक मारा
इंग्लंडच्या डावाच्या सुरुवातीला अलेक्स लीसला बुमराने बाद केले. सतत टप्पा पडल्यावर बाहेर जाणारे चेंडू टाकून वेगळा विचार करायला लावून मग बुमराने राऊंड द विकेट गोलंदाजीला येऊन टप्पा पडल्यावर आत येणारा चेंडू टाकून लीसला बोल्ड केले. त्यानंतर त्याने लगेच झॅक क्रॉलीला बाहेर जाणाऱ्या चेंडूवर झेल द्यायला भाग पाडले. शुभमन गिलने त्याचा झेल बरोबर पकडला. इंग्लंडचा तिसरा फलंदाज ओली पोपलाही बुमारने माघारी धाडले.