मुंबईत सुरू झाले कसोटीपटूंचे शिबिर ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajiinkya rahane

मुंबईत सुरू झाले कसोटीपटूंचे शिबिर !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मागील १५ कसोटींमध्ये अवघ्या २४.७६ च्या सरासरीने फक्त ६४४ धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणेसाठी २५ नोव्हेंबरपासून भारतीय भूमीमध्ये खेळवण्यात येणारी न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या मालिकेत आपला ठसा उमटवता यावा यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा पहिल्या कसोटीसाठीचा कर्णधार अजिंक्य रहाणे मुंबईत सोमवारपासून सुरू झालेल्या शिबिरात कसून सराव करताना दिसला.

अजिंक्य रहाणे याने सोमवारी दुपारनंतर फलंदाजी सरावाला सुरुवात केली. मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे व भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करणारा फिरकी गोलंदाज जयंत यादव या दोघांच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणे फलंदाजीचा सराव केला. या सत्रात त्याने बचावतंत्रावर जास्त लक्ष दिले. काही फटके पुढे सरसावतही मारले. आखूड टप्प्यांच्या चेंडूवरही त्याने प्रहार केला हे विशेष. भारतीय क्रिकेट संघाचे शिबिर गुरुवारपर्यंत सुरू राहणार असून ॲबे कुरुविल्ला यांची या शिबिरावर नजर असणार आहे.

हेही वाचा: मराठी साहित्य संमेलनानिमित्त छगन भुजबळ यांची आढावा बैठक;पाहा व्हिडिओ

पुजाराचा रिव्हर्स स्वीपचा सराव
पहिल्या कसोटीसाठीचा कर्णधार अजिंक्य रहाणे याच्यासह उपकर्णधार चेतेश्‍वर पुजारा यानेही सराव सत्रात मेहनत केली. त्याने खेळपट्टीवर जास्त काळ टिकून विविध फटक्यांचा सराव केला. यामध्ये रिव्हर्स स्वीप या फटक्याचा प्रामुख्याने समावेश होता. याशिवाय शुभमन गिल व मयांक अगरवाल या दोन फलंदाजांनीही नेटमध्ये फलंदाजीचा सराव केला. इशांत शर्मा व प्रसिध कृष्णा या वेगवान गोलंदाजांनी गोलंदाजीचा सराव केला. पहिल्या दिवशी खेळाडूंनी दोन तासांच्यावर सराव केला. यावेळी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अधिकारीही उपस्थित होते. भारत-न्यूझीलंड यांच्यामधील पहिला कसोटी सामना २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथे, तर दुसरा कसोटी सामना ३ डिसेंबरपासून मुंबईत खेळवण्यात येणार आहे.

loading image
go to top