World Cup 2019 : आज कोण लॉर्ड?; स्वप्नपूर्तीसाठी इंग्लंड-न्यूझीलंड सज्ज 

cricket
cricket

लंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी यजमान इंग्लंड आणि गत उपविजेता न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना होत आहे. इंग्लंड जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असून, आक्रमक खेळामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे. दुसरीकडे किवींनी संयमी आणि योजनाबद्ध खेळ केला आहे. नव्या चेंडूवर दोन्ही संघांकडे तुल्यबळ गोलंदाज आहेत. दोन्ही संघांना अद्याप पहिल्यावहिल्या जगज्जेतेपदाची प्रतीक्षा आहे. 

घरच्या मैदानावर खेळण्याची संधी आणि स्थानिक प्रेक्षकांचा पाठिंबा या जमेच्या बाबी असल्या तरी इयॉन मॉर्गनच्या संघाला दडपणाखाली किवींच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. दुसरीकडे "अँडरडॉग्ज' अशी गणना होत असल्यामुळेच आम्ही झपाटून खेळत आहोत, असे किवींनी म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर ऐतिहासिक लॉर्डसवर कोण लॉर्ड बनणार याची उत्कंठा शिगेला पोचली आहे. 

दीड महिन्यांपेक्षा जास्त रंगलेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्डस्‌ मैदानावर रविवारी रंगणार असताना पहिल्यांदा विश्वविजेतेपदाचे स्वप्न कोणाचे साकारणार, याची सगळ्यांना कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. यजमान इंग्लंडला सगळेच जाणकार पहिल्यापासून संभाव्य विजेते संबोधत होते. अपेक्षांना जागत इंग्लंड अंतिम फेरीत धडाक्‍याने पोचला आहे, पण न्यूझीलंड त्यांना चकित करण्याकरिता योजना आखत आहे. भारताला पराभूत करताना न्यूझीलंडने केलेला खेळ इंग्लंड विसरणार नाही आणि लढवय्या प्रतिस्पर्ध्याला गृहीत धरायची चूक करणार नाही. 

प्रदीर्घ मोहिमेची सांगता जवळ आली आहे. उपांत्य सामन्यात दणकट संघांना पराभवाचे चटके देत दोन्ही संघ लॉर्डसवर दाखल झाले आहेत. यजमान 1992 नंतर अंतिम फेरीत आला आहे, तर न्यूझीलंडने सातत्य दाखवत सलग दुसऱ्या स्पर्धेत तीच मजल मारून दाखवली आहे. भावनांवर कोण ताबा ठेवू शकतो, आणि दडपणाखाली उत्तम कामगिरी करायची जिगर दाखवू शकतो, तोच संघ विजेतेपदाला गवसणी घालणार आहे. 

स्पर्धेचा आढावा घेतला तर सगळा नवीन चेंडूवरील पहिल्या एका तासाचा खेळ महत्त्वाचा आहे. त्यात कोणत्या संघाचे गोलंदाज समोरच्या फलंदाजांना बाद करतात त्यांनाच विजयाचा मार्ग मिळणार आहे. खास करून इंग्लंडचे जेसन रॉय-जॉनी बेअरस्टा तुफानी आक्रमक खेळत आहेत. ट्रेंट बोल्ट-मॅट हेन्री भारताविरुद्ध केली तशी कमाल परत करणार का, हे बघायला 30 हजार प्रेक्षक श्‍वास रोखून बसतील. 
इंग्लंडची फलंदाजी ऐन भरात असताना न्यूझीलंडला फलंदाजीची चिंता भेडसावत आहे. मार्टिन गुप्टिलला सातत्याने अपयश आले आहे. ख्रिस वोक्‍स आणि जोफ्रा आर्चरच्या तिखट माऱ्याला किवी फलंदाज कसे सामोरे जातात, यावर रंगत विसंबून असेल. लढत द्यायला केवळ कर्णधार केन विल्यमसनवर अवलंबून न राहता बाकी न्यूझीलंड फलंदाजांना खेळाचा दर्जा उंचावण्याची गरज आहेत. 

नुसता कागदावर नव्हे, तर मैदानावरही इंग्लंड सरस आहे. इंग्लंडचीच सरशी होणार असल्याचा अंदाज बहुतेक जाणकार व्यक्त करत आहेत. अंतिम सामन्यात घरच्या मैदानावर खेळून प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे जास्त दडपण इंग्लंडवर असेल, त्याचा फायदा न्यूझीलंड घेतो का, हीच उत्सुकता आहे. सगळी तिकिटे कधीच विकली गेली असली तरी, काही निराश झालेले भारतीय चाहते आपली तिकिटे विकून टाकताना आढळले आहेत. 

खेळपट्टीवर गवत 
शेवटपर्यंत चांगली राहण्याच्या एकमेव उद्देशाने थोडीशी हिरवी छटा असलेली खेळपट्टी बनवण्यात आली आहे. मैदानावरील उतार खेळपट्टीवरही थोडा परिणाम करतो. "ट्रेंट बोल्टने पॅव्हेलियनच्या बाजूने आणि मॅट हेन्रीने मीडिया सेंटरच्या बाजूने गोलंदाजी केली तर फायदा होईल आणि गुप्टिलला संघ व्यवस्थापनाने टी-20 सारखी फलंदाजी कर, अशी मोकळीक दिली पाहिजे,' असा सल्ला सचिन तेंडुलकरने अनुभवाचा आधार घेत दिला. 

स्काय टीव्ही "फ्री' 
भारताच्या तुलनेत इंग्लंडमध्ये केबल टीव्ही घरात असणे खूप महागात पडते. स्पर्धेच्या प्रक्षेपणाचे हक्क स्काय टीव्हीने विकत घेतले आणि ज्यांना टीव्हीवर सामने बघायचे आहेत, त्यांना खूप किंमत लावली. बऱ्याच स्थानिक लोकांनी स्काय परवडत नसल्याचे सांगत टीव्हीवर सामने न बघण्याचा निर्णय घेतला. अर्थातच स्काय टीव्हीवर लोकांचा राग होता. अखेर इंग्लंड अंतिम सामन्यात दाखल झाला म्हटल्यावर स्काय टीव्हीने मोठा निर्णय घेताना अंतिम सामना सगळ्यांना कोणतीही फी न भरता बघायला मिळणार असल्याची घोषणा केली. तेव्हा आता सामन्याचा आनंद इंग्लंडमधील सगळे लोक घेऊ शकणार आहेत. 

इंग्लंडसाठी बक्षीस 
अंतिम सामना जिंकले तर इंग्लंड संघातील खेळाडूंची चांगलीच चांदी होणार असल्याचे समजते. विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकारले गेले तर प्रत्येक खेळाडूला दोन लाख पौंड रोख बक्षीस मिळणार असल्याचे समजते. 

बेलीस यांना विश्‍वास 
इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलीस यांनी रविवारचा सामना म्हणजे एका पिढीला प्रेरित करायची नामी संधी असल्याचे म्हटले आहे. इंग्लंडमधली फुटबॉलची लोकप्रियता तुफान वाढली असताना क्रिकेटची चांगलीच घसरली आहे. यजमान संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आल्याने क्रिकेटकरिता थोडा उत्साह वाढला आहे. अंतिम सामना जिंकला तर इंग्लंडमधील लहान मुले आणि तरुण पिढी क्रिकेटकडे परत वळतील, असा बेलीस यांचा विश्वास आहे. 

सामन्याचे खूप मोठे मोल : मॉर्गन 
खेळाडूंनी मेहनत केली आहे आणि चाहत्यांनी प्रेम केले आहे, पाठिंबा दिला आहे. म्हणूनच नुसते माझ्याकरिताच नाही, तर सगळ्या खेळाडूंकरिता आणि इंग्लंडमधील सगळ्या क्रिकेटप्रेमींकरिता रविवारच्या अंतिम सामन्याचे मोल मोठे आहे. प्रचंड उत्साह आणि दडपण यांचे मिश्रण आहे हा सामना. त्याचा परिणाम खेळावर होऊ देता कामा नये. सर्वांना कल्पना आहे की, न्यूझीलंडने काय कमाल कामगिरी करून हा टप्पा गाठला आहे. याचाच अर्थ अंतिम सामन्यात ते टक्कर देणार आहे आणि बरेच प्रश्न आम्हाला विचारणार आहेत. त्यांच्या संघात केन हा सर्वांत महत्त्वाचा खेळाडू आहे आणि बाकीचे खेळाडू गुणवान असल्याने ते बरोबर त्याला साथ देतात. शेवटी मी इतकेच म्हणेन की, अंतिम सामना म्हणजे आम्हाला आमच्या देशात क्रिकेटच्या भल्याकरिता काहीतरी कमाल करून दाखवायची संधी आहे. 

भावनांवर नियंत्रण ठेवायला हवे : केन विल्यमसन 
विश्वचषक अंतिम सामना म्हणजे भावनांचा कल्लोळ असतो. भावनांवर नियंत्रण ठेवता यायला पाहिजे. जर चांगला खेळ करायचे असेल तर त्याकरिता मागचा पुढचा विचार न करता फक्त समोर येणाऱ्या एका क्षणावर लक्ष केंद्रित करता यायला हवे. लोक इंग्लंडला संभाव्य विजेते म्हणत असताना आम्हांला अंडरडॉग्ज म्हणत आहेत. आम्ही नक्की कोणते डॉग्ज आहोत हे मलाच समजत नाहीये. मला वाटते फलंदाजी असो वा गोलंदाजी, पहिल्या 10 षटकांचा खेळ लय सापडायला महत्त्वाचा आहे. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टा कशी आक्रमक फलंदाजी करत आहेत आपण सगळे बघत आलो आहोत. त्यांना बाद करता यायला हवे. न्यूझीलंड सलग दुसऱ्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात खेळणार असल्याने मायदेशात उत्साहाला उधाण आले आहे. प्रचंड लांबचा प्रवास करून काही चाहते संघाला प्रोत्साहन देण्याकरिता लंडनला दाखल झाले आहेत. खेळाडू म्हणून आम्हाला फक्त चांगला खेळ करण्यावर लक्ष द्यायचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com