T20 World Cup Final | NZ vs AUS Final: कोण ठरेल वरचढ? पाहा आकडेवारी काय सांगते... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NZ-vs-AUS-Final

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया, दोघांनीही अद्याप एकदाही टी२० विश्वविजेतेपद मिळवलेलं नाही.

NZ vs AUS Final: कोण ठरेल वरचढ? पाहा आकडेवारी काय सांगते...

AUS vs NZ, T20 World Cup Final: गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेचा आज अंतिम सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन शेजारील देशांमध्ये दुबईच्या मैदानात हा सामना खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आपापल्या गटात दुसरा क्रमांक पटकावत उपांत्य फेरी गाठली होती. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडला तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे आता यंदाच्या विजेतेपदासाठी हे दोन संघ आपसात भिडणार आहे. आजच्या अंतिम सामन्यात एक गोष्ट मात्र नक्कीच घडणार आहे, ती म्हणजे जगाला एक नवा टी२० विश्वविजेता संघ मिळेल. कारण आतापर्यंत या दोनही संघांनी एकदाही टी२० विश्वचषक जिंकलेला नाही.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

AUS vs NZ, जाणून घेऊया महत्त्वाची आकडेवारी...

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये एकूण १४ टी२० सामने खेळण्यात आले आहेत. त्यापैकी ९ वेळा ऑस्ट्रेलियाने तर ५ वेळा न्यूझीलंडने बाजी मारली आहे. आज ज्या दुबईच्या मैदानात सामना खेळला जाणार आहे, त्या मैदानावर हे दोन संघ याआधी कधीही समोरासमोर आलेले नाहीत. एकमेकांशी खेळण्यात आलेल्या शेवटच्या ५ सामन्यांचा हिशोब लावला तर ३ सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत आणि २ सामन्यात कांगारूंचा विजय झाला आहे. सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे. टी२० वर्ल्ड कपच्या इतिहासात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया केवळ एकदा समोरासमोर आले आहेत. त्यावेळी न्यूझीलंडच्या संघाने बाजी मारली आहे. त्यामुळे आजचा सामना नक्कीच रोमांचक होणार, अशी चिन्हं आहेत.

हेही वाचा: T20 WC : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातही भारत-पाकप्रमाणेच 36 चा आकडा!

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील प्रवास

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाचा संघ अ गटातून सेमीफायनलला पोहोचला. या गटात ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांपैकी ४ सामन्यात विजय मिळवला. इंग्लंडच्या संघाने ऑस्ट्रेलियाला झोडपून काढले. पण त्याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, विंडिज आणि श्रीलंका या चारही संघांना ऑस्ट्रेलियाने धूळ चारली. सेमीफायनच्या सामन्यात देखील स्पर्धेत अजिंक्य असणाऱ्या पाकिस्तानला मोक्याच्या क्षणी त्यांनी पराभूत केले आणि २०१०नंतर प्रथमच टी२० वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली.

हेही वाचा: T20 WC ENG vs NZ : इंग्लंडच्या पदरी झिरो; न्यूझीलंड ठरला हिरो

न्यूझीलंड

न्यूझीलंडचा संघ ब गटातून सेमीफायनल फेरीपर्यंत पोहोचला. स्पर्धेच्या साखळी फेरीत अजिंक्य असणाऱ्या पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला. पण त्यानंतर भारत, नामिबिया, अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड या चारही देशांना पराभूत करून त्यांनी उपांत्य फेरी गाठली. पुढे सेमीफायनलच्या सामन्यात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या इंग्लंडला सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात धूळ चारत त्यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

loading image
go to top