

T20 World Cup 2024 India vs Ireland : ज्या हार्दिक पंड्याला गेले ६ महिने विविध अडचणींना तोंड द्यावे लागले, त्याच हार्दिक पंड्याला टी२० वर्ल्डकपमध्ये भारताच्या पहिल्या सामन्यात क्रिकेटने कडेवर घेतले. नव्या चेंडूने तिखट मारा करताना हार्दिक पंड्याने चार षटकात २७ धावा देत ३ फलंदाजांना बाद केले. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी प्रभावी मारा करून ८ फलंदाजांना बाद करून कमाल केली. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडचा डाव ९४ धावांवर आटोपला तिथेच भारतीय संघाच्या विजयाचे दरवाजे उघडले गेले.
नासाऊ कौंटी मैदानावरच्या खेळपट्टीचा अंदाज यायला नाणेफेक जिंकणारा कप्तान गोलंदाजी करायचा निर्णय घेणार, हे उघड गुपित होते. रोहित शर्माने तेच केले. भारतीय संघातील फलंदाजीची खोली वाढवण्यासाठी हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या चार अष्टपैलू खेळाडूंना जागा देण्यात आली. भारत वि. आयर्लंड सामन्यासाठी नवीन नाही, तर भारताच्या सराव सामन्यासाठी वापरलेली खेळपट्टी निवडली गेली.
अर्शदीप सिंगने गोलंदाजी चालू केल्यावर लगेच दिसून आले, की टप्पा पडल्यावर चेंडू काहीसा थांबून येत होता तसेच मधूनच उडत होता आणि खालीसुद्धा राहत होता. आयरिश फलंदाजांनी कष्ट करून धावा पळून काढायचा प्रयत्न केला नाही. वरच्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या खेळाडूंनी बॅटचा वापर दांडपट्ट्यासारखा केला. मोठे फटके मारायच्या प्रयत्नात एकामागोमाग एक फलंदाज चूक करून बाद होत गेले. अर्शदीपसिंगने सलामीच्या जोडीला तंबूत परत पाठवले. कप्तान पॉल स्टर्लिंग आणि बेलबर्नी पाठोपाठ हॅरी टॅक्टर लवकर बाद झाल्याने आयर्लंडचा डाव डगमगला.
मधल्या टप्प्यात हार्दिक पंड्याने सलग चार षटके मारा करून तीन फलंदाजांना बाद केले. जसप्रीत बुमराच्या ३ षटकात फक्त ६ धावा काढता आल्या आणि दोन फलंदाज बाद झाले. गॅरेथ डेलनीने बॅटचा प्रभावी वापर करून दोन चौकार, दोन षटकारांसह नाबाद २५ धावा जमा केल्या, म्हणून आयर्लंड संघाला ९४ धावा तरी उभारता आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.