T20 WC - किवी पहिल्यांदाच फायनलमध्ये; मिशेल-निशामची कमाल | Cricket | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

T20 WC - किवी पहिल्यांदाच फायनलमध्ये; मिशेल-निशामची कमाल

इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकून न्यूझीलंडने २०१९ च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये झालेल्या पराभवाची परतफेड केली.

T20 WC - किवी पहिल्यांदाच फायनलमध्ये; मिशेल-निशामची कमाल

इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकून न्यूझीलंडने २०१९ च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये झालेल्या पराभवाची परतफेड केली. टी २० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने डेरिल मिशेलच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या आणि जिमि निशामच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने पहिल्यांदाच टी२० वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच धडक मारली आहे. लॉर्ड्सवर २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवाची सल न्यूझीलंडला होती. त्या पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्यानेच न्यूझीलंड मैदानात उतरले होते.

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १६६ धावा केल्या. इंग्लंडच्या मोईन अलीने ३७ चेंडूत सर्वाधिक ५१ धावा केल्या तर डेविड मलानने ३० चेंडूत ४१ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून टीम साउथी, अॅडम मिल्ने, इश सोधी आणि जिम्मी निशाम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तर टेंट बोल्टला चार षटकात एकही गडी बाद करता आला नाही, शिवाय त्याच्या चार षटकात इंग्लंडने ४० धावा लुटल्या.

इंग्लंडने दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अडखळत झाली. न्यूझीलंडच्या २ बाद १३ अशा धावा झाल्या होत्या. इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने मार्टिन गुप्टील आणि केन विल्यम्सन यांना बाद केले. त्यानंतर मिशेल आणि डेवोन कॉनवे यांनी ८२ धावांची भागिदारी करून संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. दरम्यान, इंग्लंडच्या लियाम लिविंगस्टनने दोन गडी बाद करत न्यूझीलंडला दणका दिला. तेव्हा सामनान पुन्हा एकदा इंग्लंडच्या बाजुने झुकला.

इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या १७ व्या षटकात न्यूझीलंडने २३ धावा कुटल्या. इथे पुन्हा सामन्याचे पारडे न्यूझीलंडच्या दिशेने झुकले. त्यानंतर न्यूझीलंडने सामन्यावर पूर्ण पकड मिळवली. याचवेळी जिमी निशाम बाद झाला. त्याने १० चेंडूत २७ धावांची वेगवान खेळी केली. त्याची ही खेळी न्यूझीलंडला विजयाच्या दिशने नेणारी ठरली. मात्र जॉनी बेअरस्टोकडे झेल देऊन तो बाद झाला. त्यानंतर मिशेलने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. अखेरच्या चार षटकात न्यूझीलंडला ५७ धावांची गरज होती. जिमी निशामने केलेल्या फटकेबाजीनंतर मिशेलसुद्धा न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर तुटून पडला.

दरम्यान, इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना त्यांचेही सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाले. जोस बटलर २९ धावा करून तर बेअरस्टो १३ धावा करून बाद झाला. तर जेसन रॉय खेळू शकला नाही. मोईन अली आणि मलान यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६३ धावांची भागीदारी केली. कॉनवेने मलानचा १० धावांवर झेल सोडला. इंग्लंडची एकवळे अवस्था २ बाद ६७ अशी होती. मलान आणि मोईनच्या खेळीमुळे संघाचे शतक धावफलकावर लागले.

न्यूझीलंडला इंग्लंडच्या लिव्हिंगस्टनने फिरकीच्या जाळ्यात अडकवले होते. अखेरच्या टप्प्यात न्यूझीलंडवर दबाव टाकण्यात लिव्हिंगस्टनच्या फिरकीने यश मिळवले होते. मात्र जिमी निशामच्या फटकेबाजीने इंग्लंडच्या तोंडचा घास पळवला. त्यानंतर मिशेलनेसुद्धा चार षटकार मारले आणि चौकारासह विजयी चौकार खेचत इंग्लंडला धक्का दिला.

loading image
go to top