
AFG vs NAM: अफगाणिस्तानने नामिबियाचा दारूण पराभव
T20 WC: संघाचा मोठा विजय तरीही खेळाडूला अश्रू अनावर (Video)
IND vs NZ T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्ध थोडक्यात पराभव सहन करावा लागलेल्या अफगाणिस्तानने टी२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवला. रविवारच्या सामन्यात त्यांनी नामिबियावर ६२ धावांनी सहज मात केली. सलामीच्या सामन्यात स्कॉटलंडला १४० धावांनी पराभूत करून शानदार सुरवात करणाऱ्या अफगाणिस्तानने आज नामिबियावर तेवढाच एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे त्यांची सरासरी (+ ३.०९७) भक्कम झाली. प्रथम फलंदाजी करताना १६० धावा केल्यानंतर नामिबियाला ९ बाद ९८ असे रोखले.
शारजाच्या खेळपट्टीवर १६० धावांचे लक्ष नामिबियासाठी कठीणच होते. त्यात राशिद खान मोहम्मद नबी असे फिरकी गोलंदाज असताना त्यांचा कस लागणार, हे उघड होते; परंतु अफगाणिस्तानच्या नवीन उल हक, हमीद हसन आणि गुलबदीन नईब या वेगवान गोलंदाजांनी नामिबियाच्या फलंजाजीची दाणादाण उडवली. तत्पूर्वी हझरतुल्ला झझाई आणि महम्मद शहझाद यांनी अफगाणिस्तानचा वेगवान अर्धशतकी सलामी दिली; परंतु १२ व्या षटकांपर्यंत त्यांच्या खात्यात ४ बाद ११३ एवढ्याच धावा जमा होत्या.
आपला अखेरचा सामना खेळणारा आणि गार्ड ऑफ ऑनरचा सन्मान स्वीकारत मैदानात आलेल्या अशघर अफगणने तीन चौकार आणि एका षटकारासह २३ चेंडूतील ३१ धावांची आपली अखेरची खेळी साकार केली. त्यानंतर कर्णधार महम्मद नबीने १७ चेंडूत ३२ धावांचा तडाखा दिल्यामुळे अफगाणिस्तानने १६० धावा उभारल्या. निवृत्तीचे भाषण करताना त्याच्या भावना अनावर झाल्या आणि त्याला अश्रू अनावर झाले.
संक्षिप्त धावफलक :
नामिबिया : २० षटकांत ५ बाद १६० (हझरतुल्ला झझाई ३३ - २७ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, महम्मद शहझाद ४५ -३३ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, अशघर अफगाण ३१ -२३ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, महम्मद नबी नाबाद ३२ -१७ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, रुबेन ट्रंपलमान ३४ २, ईटॉन २१-२) पराभूत वि. नामिबिया : २० षटकांत ९ बाद ९८ (डेव्हिड विझ २६, नवीन उल हक २६-३, हमीद हसन ९-३, गुलबदिन नईब १९-२, रशीद खान १४-१)