शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. सराव सत्र पूर्ण करून भारतीय खेळाडू लंडनहून लीड्सला दाखल झाले आहेत आणि इथेच २० जूनपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. पण, त्याचवेळी भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवही लंडनमध्ये दाखल झाल आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार त्याच्यावर स्पोर्ट्स हर्नियावर येथे उपचार केले जाणार आहेत आणि तो ऑगस्टपर्यंत मैदानापासून दूर राहणार आहे. भारतीय संघाची येत्या दोन महिन्यांत मर्यादित षटकांची मालिका नाही आणि त्यामुळे या कालावधीत सूर्याने दीर्घकाळ झगडत असलेल्या आजारावर उपचार करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.