भारतीय नियामक क्रिकेट मंडळाला बुधवारी बॉम्बे उच्च न्यायालयाने दणका दिला. बॉम्बे उच्च न्यायालयाने आयपीएलमधील माजी संघ कोची टस्कर्स केरळच्या बाजूने ५३८ कोटी रुपयांच्या लवाद निर्णयाला मान्यता दिली आहे. कोची टस्कर्स केरळ संघ २०१० मध्ये आयपीएलमध्ये खेळला होता आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांचा करार संपुष्टात आला. पण, बीसीसीआयने कोची क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड (केसीपीएल) ला ३८४ कोटी रुपये आणि रेंडेझव्हस स्पोर्ट्स वर्ल्ड (RSW) ला १५४ कोटी रुपये परत देण्याचे आदेश लवाद न्यायाधिकरणाने दिले होते. बीसीसीआयने २०१५ च्या लवाद न्यायाधिकरणाच्या निर्णयाला आव्हान दिले होते आणि आज उच्च न्यायालयाने त्यांची आव्हान फेटाळून लावले.