Ind vs Eng Test Cricket : भारताचा मायदेशातील गड अभेद्यच ; ध्रुवने दाखवले इंग्लंडला तारे

पहिल्या डावात झुंझार ९० धावा आणि आज दुसऱ्या डावात निम्मा संघ १२२ धावांत गारद झाल्यावर फटकावलेल्या नाबाद ३९ धावा... अडचणीतून मार्ग काढणाऱ्या ध्रुव जुरेलने शुभमन गिलसह इंग्लंडला भर दुपारी तारे दाखवले आणि भारताने चौथा कसोटी सामना पाच विकेटने जिंकत ३-१ अशी विजयी आघाडी घेऊन मालिका खिशात टाकली.
Ind vs Eng Test Cricket
Ind vs Eng Test Cricket sakal

रांची : पहिल्या डावात झुंझार ९० धावा आणि आज दुसऱ्या डावात निम्मा संघ १२२ धावांत गारद झाल्यावर फटकावलेल्या नाबाद ३९ धावा... अडचणीतून मार्ग काढणाऱ्या ध्रुव जुरेलने शुभमन गिलसह इंग्लंडला भर दुपारी तारे दाखवले आणि भारताने चौथा कसोटी सामना पाच विकेटने जिंकत ३-१ अशी विजयी आघाडी घेऊन मालिका खिशात टाकली. आपला दुसराच सामना खेळत असलेला जुरेल सामन्यात सर्वोत्तम ठरला.

भारताच्या विजयाच्या हे अंतर दिसायला पाच विकेटचे असले तरी सामना कमालीचा संघर्षाचा झाला. विजयासाठी आवश्यक होत्या १९२ धावा, त्यात काल केल्या होत्या बिनबाद ४० धावा. आज रोहित शर्मा (५५) आणि यशस्वी जयस्वाल यांनी एकूण सलामी दिली ८४ धावांची; पण त्यानंतर पाच बाद १२० अशी अवस्था झाल्यावर पराभवाचे काळे ढग जमू लागण्याचे संकेत मिळत होते. मात्र, त्यानंतर फलंदाज येणाऱ्या ध्रुव जुरेलने जणू काही पुढच्या ७२ धावा सोप्या आहेत, अशा आत्मविश्वासात फलंदाजी केली. समोर लढत असलेल्या शुभमन गिलला (नाबाद ५२) यालाही मोलाची साथ दिली आणि भारताने हा सामना चौथ्याच दिवशी चहापानाअगोदरच जिंकला. या विजयासह भारताने मायदेशातील सलग १७ वी कसोटी मालिका जिंकली आहे.

चौथ्या दिवशीचा खेळ चालू झाल्यावर रोहित शर्मा - यशस्वी जयस्वाल जोडीने एकदम छान फलंदाजी केली. सकाळी गार हवामानामुळे रांचीच्या खेळपट्टीवर चेंडू जरा चांगल्याप्रकारे बॅटवर येत असल्याचा फायदा घेत दोघा फलंदाजांनी धावा जमा केल्या. चांगल्या गोलंदाजांना बरोबर खेळणाऱ्या जयस्वालने ज्यो रूटला विकेट दिली. रोहित शर्माने अर्धशतक केल्यावर आपली विकेट हकनाक गमावली. हार्टलीने चेंडू टाकायच्या अगोदर रोहितने क्रीज सोडून पुढे येण्याची चूक केली आणि फोक्स् याने रोहितला यष्टिचीत केले.

रजत पाटीदारच्या कमजोर खेळाची कहाणी रांचीलाही पुढे चालू राहिली. शोएब बशीरने पाटीदारपाठोपाठ सर्फराझ खान पहिल्याच चेंडूवर बाद करून भारतीय संघावरचे दडपण वाढवले. जेव्हा उपहारानंतर जडेजा बशीरच्या फूलटॉस चेंडूवर झेलबाद झाला तेव्हा इंग्लंड संघाला अशक्यप्राय विजयाची स्वप्ने पडू लागली. पहिल्या डावात सुंदर फलंदाजी करून भारतीय संघाला ३०० धावांचा टप्पा पार करून देणाऱ्या ध्रुव जुरेलने शुभमन गिलला झकास साथ दिली. दोघांनी कोणताही मोठा फटका न मारता मोकळ्या जागेत चेंडू ढकलून पळून धावा काढणे चालू केले.

११९ चेंडूनंतर गिलचा मोठा फटका

रोहित, यशस्वी आणि जडेजा असे महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यावर एक बाजू नेटाने लढवणाऱ्या गिलने कमालीची संयमी फलंदाजी केली ११९ चेंडूत त्याने एकही चौकार-षटकार असे मोठे फटके मारले नाहीत. विजय अवाक्यात आल्यानंतर त्याने दोन उत्तुंग षटकार ठोकले.

संक्षिप्त धावफलक :

इंग्लंड पहिला डाव : ३५३ आणि दुसरा डाव १४५. भारत पहिला डाव : ३०७ आणि दुसरा डाव : ६१ षटकांत ५ बाद १९२ (रोहित शर्मा ५५, यशस्वी जयस्वाल ३७, शुभमन गिल नाबाद ५२ - १२४ चेंडू, २ षटकार, रजत पाटिदार ०, रवींद्र जडेजा ४, सर्फराझ खान ०, ध्रुव जुरेल नाबाद ३९ - ७७ चेंडू, २ चौकार, ज्यो रूट ७-०-२६-१, टॉम हार्टली २५-२-७०-१, शोएब बशीर २६-४-७९-३)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com