
पहिल्या कसोटीत हार स्वीकारावी लागल्यानंतर आणि हुकमी जसप्रीत बुमरा संघात नसतानाही दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने सपाटून मार दिल्यानंतर इंग्लंड संघाची झोप उडाली आणि लगेचच तिसरा सामना होणाऱ्या लॉर्ड्स मैदानाची खेळपट्टी चर्चेचा विषय ठरू लागली. सामन्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना खेळपट्टी हिरवी दिसू लागली आणि सामना सुरू होतानाही त्याचा रंग असाच हिरवी छटा असणाराच असेल याचे संकेत मिळाले.
दोन कसोटी सामन्यात मिळून शतकांची माळ लागली असताना दोन्ही बाजूचे गोलंदाज मारा करून थकून गेले. फलंदाजीला पोषक खेळपट्टी आणि लवकर मऊ होणारा ड्युक्स कंपनीचा लाल चेंडू गोलंदाजांसमोर समस्या निर्माण करून गेला. मालिका चालू असताना वेगळ्या कंपनीचा चेंडू घेणे शक्य नसले तरी खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी बनवणे शक्य आहे. इंग्लंड संघ नेमका तोच विचार करत आहे.