भारत-इंग्लंड कसोटी मालिका ही एखाद्या बॉलिवूड चित्रपटातील नाट्यमय वळणासारखी राहिली. मालिकेतील सर्व सामने शेवटच्या दिवसापर्यंत गेले आणि शेवटच्या क्षणापर्यंत टीम इंडियाने झुंज दिली. लॉर्ड्सवरील मोहम्मद सिराजची विकेट पडली नसती तर रवींद्र जडेजाने तो सामना खेचून आणला होता. पण, सिराजने ती सल भरून काढताना इंग्लंडला धक्के दिले आणि पाचव्या कसोटीत थरारक विजय मिळवून दिला. मालिका २-२ अशी बरोबरीत सुटल्यानंतर शुभमन गिल आणि हॅरी ब्रूक यांना प्लेअर ऑफ दी सीरिजचा पुरस्कार दिला गेला. इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत दोन्ही संघांतील खेळाडूंना हा पुरस्कार देण्याची परंपरा आहे आणि या खेळाडूंची निवड प्रतिस्पर्धी संघाचे मुख्य प्रशिक्षक करतात...