
सुनंदन लेले : बांगलादेशला हरवून विजयी सलामी दिली असली तरी चॅम्पियन्स स्पर्धेतील या सामन्यात बऱ्याच चुका झाल्या. क्षेत्ररक्षणातील चुका मुळावर येऊ शकतात, याची जाणीव भारतीय संघाला आहे. रविवारी होणाऱ्या पाकिस्तानसमोरच्या महत्त्वाच्या लढतीची तयारी करीत असताना त्याच चुका टाळण्याकडे भारतीय संघ लक्ष देणार आहे.
एखाददुसरा झेल सुटतो. अगदी सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाकडूनही चूक होऊ शकते. जर झेल किंवा फलंदाजांना बाद करायची संधी एकाच सामन्यात तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निसटली असेल तर मग मात्र त्याचा गांभीर्याने विचार करावा लागतो. भारतीय संघाने बांगलादेशसमोर खेळताना झेल सोडले तसेच धावबाद करायची आणि यष्टीचीतची संधीही दवडली.